शहरातील अनधिकृत बांधकामांवरून भाजप घेरणार प्रशासनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:29+5:302021-02-18T05:15:29+5:30

ठाणे : दिव्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या भाजपच्या काही मंडळींवर पालिकेने चुकीच्या पध्दतीने एमआरटीपीअंतर्गत कारवाई केल्याचे प्रकरण ...

BJP will surround the administration over unauthorized constructions in the city | शहरातील अनधिकृत बांधकामांवरून भाजप घेरणार प्रशासनाला

शहरातील अनधिकृत बांधकामांवरून भाजप घेरणार प्रशासनाला

Next

ठाणे : दिव्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करणाऱ्या भाजपच्या काही मंडळींवर पालिकेने चुकीच्या पध्दतीने एमआरटीपीअंतर्गत कारवाई केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपच्या नगरसेवकांनी केवळ दिव्यातीलच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात कोरोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांवरून अतिक्रमण विभागाला घेरण्याची तयारी केली आहे. यासंदर्भातील लक्षवेधी गुरुवारी होणाऱ्या महासभेत भाजप मांडणार आहे. सत्ताधारी शिवसेना या लक्षवेधीवर भाजपला चर्चा करू देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यातील हॉस्पिटलच्या आरक्षित भूखंडांवर अनधिकृत बांधकाम उभारण्यात येत असल्याची तक्रार केली होती. परंतु त्या ठिकाणी तसे बांधकामच सुरू नसल्याचा दावा महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीने केला होता. याउलट ज्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती, त्यांच्याविरोधात एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच मुद्द्यावरून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला होता. भाजपचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनीदेखील दिव्यात जाऊन पाहणी करून अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आगामी अधिवेशनात लावून धरण्याचा इशारा दिला होता. तसेच आहेर यांच्या निलंबनाची मागणीही केली होती.

दरम्यान, आता भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी दिव्यासह, मुंब्रा, कळवा, घोडबंदर, माजिवडा आणि संपूर्ण ठाणे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत महासभेत लक्षवेधी मांडली आहे. या बांधकामांमुळे महापालिकेच्या पायाभूत सोयीसुविधांवर ताण आला असून, पाणीटंचाईसारख्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. तसेच पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

...............

एखाद्या प्रभाग समितीत अनधिकृत बांधकाम होत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार सहायक आयुक्तांना असतात. परंतु कारवाई केली नसेल किंवा त्या बांधकामांकडे दुर्लक्ष केले असेल तर संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाई अपेक्षित आहे. त्यामुळे कारवाई करण्याचे धाडस आयुक्त दाखविणार का, असा सवालही वाघुले यांनी केला आहे.

...............

‘आपला दवाखाना’ची होणार चिरफाड

आपला दवाखाना सुरू करण्यासाठी मूळ कंपनीच्या नावाने कार्यादेश न देता, या कंपनीतील भागीदाराच्या कंपनीच्या नावे कार्यादेश दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महासभेत आक्रमक होणार असून ‘आपला दवाखाना’ची ते चिरफाड करणार आहेत.

Web Title: BJP will surround the administration over unauthorized constructions in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.