भाजपाने पालघर चिटिंग करून जिंकले- आदित्य ठाकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:15 AM2018-06-19T05:15:22+5:302018-06-19T05:15:22+5:30
पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली.
ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेते
तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. पालघरच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन होते, म्हणून भाजपा जिंकली. परंतु, सिनेटच्या निवडणुकीत आणि
आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने ही निवडणूक शिवसेना जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.
कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने संजय मोरे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा रेमण्ड हॉल येथे आयोजित केला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. जेव्हा शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढल्या, तेव्हा आपण जिंकलो आहोत. पालघरमध्येही खरेतर आपण जिंकलो आहोत. मात्र, ईव्हीएमने भाजपाच्या पदरात यशाचे माप टाकले. भाजपाच्या ‘चुनावी जुमल्या’विषयी बोलण्याचा आता कंटाळा आला असून दोन कोटी रोजगार देण्यावरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. उलट, नोटाबंदीमुळे ४० लाख रोजगार गेले, अशी टीका त्यांनी केली.
आजच्या शिक्षणामुळे रोजगार मिळेल का, स्वयंरोजगार करता येईल का, याची खात्री तरुणांना राहिलेली नाही. त्यामुळेच शिवसेना शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करत आहे. मुंबई विद्यापीठातील गोंधळाकरिता शिवसेनेमुळेच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला, हे आपले मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.
शिवसैनिक पेटून उठला की काय होते, ते सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकून आपण दाखवले. त्यामुळेच विधान परिषदेच्याही अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.