भाजपा कार्यकर्त्यांसाठी महामंडळ, मुख्यमंत्रीही दूर, अच्छे दिनाची प्रतीक्षा संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:04 AM2017-12-27T03:04:33+5:302017-12-27T03:04:53+5:30
डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. पण जसजशा पुढील निवडणुका समीप येत आहेत तसतशी कार्यकर्त्यांमध्येच अच्छे दिन कधी येणार अशी चर्चा सुरु असून महामंडळांचेही गाजर दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे महामंडळ दूर असतांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट होत नसल्याने नगरसेवक-कार्यकर्ते नाराज असल्याची उघड चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात मनसेचे डोंबिवलीतील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले, पण तेथे गेलेल्या डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांची मात्र मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नसल्याची सल ‘लोकमत’शी बोलतांना जुन्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमधून पक्षाला तीन आमदार, एक खासदार मिळाले. मुरबाडची आमदारकीही भाजपाने राखली. त्यामुळे कार्यकर्त्यांना अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा होती. सत्तेची तीन वर्षे उलटली. पण अद्यापही महामंडळांचा निर्णय नाही, आता काय पदरी मिळणार? सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही गाजरच मिळाल्याची चर्चा उघडपणे सुरु आहे. २०१४ मध्ये लोकसभेला युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभेमध्ये सत्ता येण्यासाठी कार्यकर्ते राबले. केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपाची सत्ता आली, त्यामुळे अच्छे दिन येणार अशी आशा निर्माण झाली. पण कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार ५०० कोटींच्या पॅकेजचे दाखवलेल्या गाजर उपक्रमाची कार्यकर्त्यांनीही आधी मजा लुटली, पण त्यानंतर त्यांच्यामध्येही आता तीन वर्षांनंतर सर्वसामान्यांप्रमाणेच आपल्यालाही गाजर मिळाल्याची भावना आहे.
मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौरांसह शिवसेनेच्या नगरसेवकांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेत निधीच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही डोंबिवलीकरांना घेऊन जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण बालेकिल्ला म्हणवल्या जाणाºया कल्याण-डोंबिवलीतील भाजपाच्या नगरसेवकांना मात्र मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने उघडपणे खंत व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीत ज्या पद्धतीचे राजकारण झाले ते पाहता पक्षाला जर पुन्हा यश मिळवायचे असेल तर आतापासून किमान प्रश्न समजून घेण्याची तयारी करायला हवी. पण ज्यांनी त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे ते मुख्यमंत्री शिवसेनेच्या नेत्यांना लगेच वेळ देतात. मनसेच्या नेत्यांना भेटतात, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बेटण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही, याबद्दलची तीव्र नाराजी पक्षात आहे.
>दगाफटक्याची भीती
लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा तोंडावर आल्या असून भाजपामध्ये असलेली खंत वाढत गेली तर मात्र पक्षाची कोंडी वाढेल. त्यातच विधानसभाही लोकसभेच्या निवडणुकांसोबतच घेतली; तर मात्र कार्यकर्त्यांना जोमाने काम करावे लागेल. तो उत्साह, जोश टिकवून ठेवण्यासाठी आतापासूनच विशेष प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पक्षासमोरील अडचणी आणि अंतर्गत कुरबुरी वाढल्या तर निवडणुकांना सामोरे जाताना दगाफटका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.