भाजपच्या आंदोलनातून दुफळी झाली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:05+5:302021-06-27T04:26:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर शनिवारी भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळे आंदोलन ...

BJP's agitation was divided | भाजपच्या आंदोलनातून दुफळी झाली उघड

भाजपच्या आंदोलनातून दुफळी झाली उघड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर शनिवारी भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळे आंदोलन महाविकास आघाडी सरकार विरोधात केले. आंदोलनातही मीरा-भाईंदर भाजपमध्ये दोन गट पडल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. तर काँग्रेसच्या वतीने ओबीसी आरक्षण रद्द होण्यामागे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलन केले गेले.

मीरा-भाईंदर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता गटाने पाटील यांच्या नियुक्तीविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर भाजपतील दुफळी स्पष्ट झाली आहे. प्रदेश भाजपने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्या आंदोलनावरूनही शहर भाजपमध्ये दुफळी दिसून आली.

नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष व्यास यांच्या नेतृत्वाखाली मॅक्सस मॉलसमोरील नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजपचे अनेक ज्येष्ठ नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. तर मेहता गटाच्या वतीने महापौर ज्योत्स्ना हसनाळे व उपाध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली दहिसर चेकनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले गेले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

दरम्यान, भाईंदर पूर्वेला नवघर नाका येथे काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप केला.

Web Title: BJP's agitation was divided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.