राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेकडे भाजपची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:43 AM2021-08-22T04:43:19+5:302021-08-22T04:43:19+5:30
मीरा रोड : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे मीरा भाईंदर भाजपने शनिवारी सपशेल पाठ फिरवली. ...
मीरा रोड : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेकडे मीरा भाईंदर भाजपने शनिवारी सपशेल पाठ फिरवली. परंतु मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काशिमिरा नाक्यावर राणे यांचे स्वागत करून सत्कार केला.
राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणी भेटीगाठी व जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. शनिवारी राणे यांची यात्रा मीरा-भाईंदरमधून जाणार होती. मीरा भाईंदर महापालिकेतील सत्तारूढ भाजपने मात्र राणे यांच्या यात्रेकडे पाठ फिरवली. महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती, महिला बाल कल्याण सभापतींसह भाजपचे एकूण ६० नगरसेवक व समिती सदस्य असूनदेखील कोणीही राणेंच्या यात्रेकडे फिरकले नाही. भाजपचे पदाधिकारीसुद्धा गेले नाहीत.
स्वपक्षीयांनी राणेंकडे दुर्लक्ष केले असले तरी मीरा भाईंदरमधील सकल मराठा समाजाच्या वतीने राणे यांचा काशिमिरा नाक्यावर स्वागत व सत्कार करण्यात आला. विविध पक्षांतील मराठा पदाधिकारी राजकीय मतभेद बाजूला ठेवून राणे यांच्या स्वागतासाठी एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून राणे हे पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.
दरम्यान, काशिमिरा पोलिसांनी जमावबंदी व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मराठा समाजाच्या सुमारे ५० ते ६० उपस्थितांवर गुन्हा दाखल केला.
..............
वाचली