मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:28 AM2017-12-07T00:28:56+5:302017-12-07T00:29:05+5:30
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला
भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नवीन मंडळांत सक्रिय अध्यक्षांना डच्चू देत नव्या चेहºयांची वर्णी लावण्यात आल्याने पदमुक्त केलेल्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे ते बंडाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा भाजपात रंगू लागली आहे.
भाजपातील वरिष्ठांसह प्रदेशस्तरावरून कोणताही आदेश नसताना आमदार नरेंद्र मेहता यांनी शहरातील भाजपाच्या मंडळांची संख्या कमी केल्याचा दावा नाराजांकडून केला जात आहे. तसेच त्यात फेरबदल करण्याऐवजी त्यांनी त्यातून सक्रिय अध्यक्ष, पदाधिकाºयांना डच्चू देत मर्जीतील नवीन चेहºयांना संधी दिल्याचा आरोप नाराजांकडून केला जात आहे. यामुळे भाजपाने पालिका निवडणुकीतील बहुमतासाठीच आपला वापर केल्याची भावना नाराजांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाल्याने शहरातील भाजपा मंडळांकडून पक्षाचे प्रभावी कार्य होत नसल्याचा सूर वरिष्ठ स्तरावरून आळवला जात असल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे येथे मीरा-भार्इंदरमधील भाजपा पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. त्यात त्यांनी पदाधिकाºयांची झाडाझडती केली.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसह पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पालिकेत निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकासह पदाधिकाºयांना प्रत्येक केंद्राची जबाबदारी देण्याची सूचना दानवे यांनी मेहता यांना केली होती.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, माजी नगरसेवक आसीफ शेख, अनिल भोसले यांचा समावेश होता. त्यावेळी शहरात कार्यरत असलेल्या १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणली. भविष्यात भाजपात बंडाची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्यांना मंडळांची जबाबदारी दिली आहे, ती प्रभारी असून त्यावर अद्याप कुणाचीही नियुक्ती केलेली नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभारींना दिलेल्या जबाबदारीनुसार त्यांनी आपल्या मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकाºयांच्या बैठका बोलवून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे कार्य करणार आहेत. प्रसंगी स्थानिक स्तरावर त्याचा निर्णय घेतला जाऊन नवीन नियुक्ती केल्या जातील.
- चंद्रकांत वैती, उपमहापौर