भाजपचे ठाण्यात बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:37+5:302021-06-04T04:30:37+5:30
ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी ठाण्यात भाजपने राज्य ...
ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी ठाण्यात भाजपने राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. सरकारच्या चुकीमुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१९ ला यासंदर्भात काही आदेश दिले होते, परंतु त्याला १५ महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारने याकडे गांभीर्याने न घेतल्याने हे आरक्षण रद्द होण्याची वेळ आल्याचे मत भाजपतर्फे व्यक्त करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आरक्षणाच्या बाबतीतील महाविकास आघाडीचे धोरण स्पष्ट दिसत आहे. ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही, दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचे काम सुरू आहे. ज्या मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांचा आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी डावखरे यांनी केली. तर महाविकास आघाडी अत्यंत निष्क्रिय आहे, १५ महिने झाले तारीख पे तारीख घेत बसली. त्यामुळे ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारने रस्त्यावर आणले आहे. त्यामुळे आता आरक्षण मिळविण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा यावेळी केळकर यांनी दिला.
----------