भाजपाला निवडल्याची भोगा फळे
By admin | Published: May 1, 2017 06:22 AM2017-05-01T06:22:08+5:302017-05-01T06:22:08+5:30
डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप
डोंबिवली : डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ती मिळवून देऊ, असे आश्वासन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दिले. मात्र ते देतानाच ‘भाजपाला निवडून दिलेत, भोगा आता आपल्या कर्माची फळे,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना फटकारले. नुकसान झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते.
राज ठाकरे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त रविवारी डोंबिवलीत आले होते. अरुण भोसले यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यावर राज यांनी एंकदर प्रकरण समजून गेतले. भरपाईचा मुद्दा कशामुळे अडला आहे, त्याची माहिती घेतली. नंतर मात्र त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना मनसेला निवडून न दिल्याबद्दल त्रागा केला. भाजपाला निवडून दिलेत ना, भोगा आता कर्माची फळे, अशा शब्दांत त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना फटकारले. मुख्यमंत्री हे थापामंत्री आहेत, तरीही तुमच्यासाठी मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नुकसानभरपाईचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील, उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते मंदार हळबे आदी उपस्थित होते.
प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी २६ मे रोजी स्फोट झाला होता. त्यात १२ जण मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे दोन हजार ६६४ मालमत्तांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. सात कोटी ४३ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी नागरिकांना देण्यासाठी हे पंचनामे केले गेले असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून ही नुकसानभरपाईची रक्कम दिली गेलेली नाही. त्यासाठी मनसेने नागरिकांकडून माहिती मागविली आहे. त्यांचे एक निवेदन पुन्हा कल्याणच्या तहसीलदारांना दिले जाणार आहे. येत्या २६ मेच्या आत म्हणजेच दुर्घटनेला वर्ष पूर्ण होण्याच्या आत भरपाई दिली गेली नाही. तर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेने यापूर्वीच दिला आहे. (प्रतिनिधी)