कल्याण लोकसभेवर भाजपाचा दावा, राजन सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:43 AM2018-05-08T06:43:39+5:302018-05-08T06:43:39+5:30

उल्हासनगरच्या राजकारणाच्या बदल्यात कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडावे लागणार असल्याचे तीव्र पडसाद भाजपामध्ये उमटत असून भाजपाच्या ताब्यातील डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना नेते उघडउघड दावा करू लागल्याने भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या ताब्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

 BJP's claim on Kalyan Lok Sabha, Rajan Samant's information | कल्याण लोकसभेवर भाजपाचा दावा, राजन सामंत यांची माहिती

कल्याण लोकसभेवर भाजपाचा दावा, राजन सामंत यांची माहिती

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली - उल्हासनगरच्या राजकारणाच्या बदल्यात कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडावे लागणार असल्याचे तीव्र पडसाद भाजपामध्ये उमटत असून भाजपाच्या ताब्यातील डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना नेते उघडउघड दावा करू लागल्याने भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या ताब्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युतीला विरोध केला असला, तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होईल, असा दावा भाजपा नेते सातत्याने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांच्या या दाव्याला महत्त्व आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ- अभ्यासू नगरसेवक राजन सामंत म्हणाले, कल्याण लोकसभा निवडणुकीचा अभ्यास पक्षाने केला असून येथे भाजपाचा खासदार निश्चित निवडून येईल. शिवसेनेपेक्षा सुमारे एक लाखांचे मताधिक्य आम्हाला मिळेल, असा आमचा अंदाज आहे.
डोंबिवलीत असलेल्या कोकणातील मतांच्या विभागणीसाठी शिवसेनेने महापौरपदी तेथील उमेदवार दिला असेल तर हे त्यांचे दिवास्वप्नच असेल, असा टोलाही त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार विनीता विश्वनाथ राणे यांना लगावला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तेवढा संपर्क दिवंगत नायब राज्यपाल, माजी खासदार राम कापसे यांचाही नव्हता, असेही सामंत म्हणाले. कापसे यांच्या काळात त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक झाले, तेव्हा पक्ष फारसा वाढला नसेलही; पण राज्यमंत्री चव्हाण यांनी पक्ष संघटनेला बळकटी दिल्यानेच कल्याणच्या खासदारकीच्या निवडणुकीत भाजपा निश्चितपणे बाजी मारेल, असे सांगत त्यांनी पक्ष संघटनेची बांधणी स्पष्ट केली.
भाजपाच्या मतांचे गणित मांडताना सामंत म्हणाले, डोंबिवलीतून भाजपा ५० हजारांनी पुढे असेल. कल्याण पूर्व २० हजार, उल्हासनगर २० हजार, अंबरनाथ पाच हजार, कल्याण ग्रामीण १० हजार आणि दिवा येथून किमान पाच हजार मतांची आघाडी भाजपाला मिळेल. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची सरशी होईल. त्यामुळे तेथे शिवसेनेला दिलासा मिळेल. तेथे भाजपाला फार फायदा मिळणार नाही असा अंदाज त्यांनी वर्तवला. अर्थात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे समीकरण जाणून आहेत. त्यामुळेच त्यांनी खूप लवकर तयारी सुरू केली असून गेल्या सहा महिन्यांपासून ते भाजपाशी सलगी साधत सावध पावले टाकत असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांना चिमटा काढला. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, भाजपासोबत असलेले आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघांत भाजपाची निर्णायक मते असतील. त्यामुळे शिवसेनेने आम्हाला गृहीत धरु नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत प्रचंड चुरस : शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सध्या कल्याण ग्रामीणमध्ये विविध उपक्रमांना अर्थसहाय्य करणे, आवर्जून हजेरी लावणे, तसेच जनसंपर्कावर भर दिला आहे. महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे हेही आमदारकीसाठी डोंबिवलीतून इच्छुक आहेत. त्यांना पक्षाने तेथून संधी दिली नाही, तर ते कल्याण ग्रामीणमधून इच्छुक असल्याचे सर्वश्रुत आहे. तसे झाल्यास तेथील शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची कोंडी होणार आहे. मात्र तेही जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठीच त्यांनी चार वर्षांनी जनसंपर्क कार्यालय थाटले असून कामाचा वेग वाढवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. डोंबिवली आणि कल्याण पश्चिम हे मतदारसंघ सध्या भाजपाकडे आहेत. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे भाजपासोबत आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेला तुल्यबळ लढत देण्यासाठी भाजपाने महेश पाटील यांचा विचार सुरू ठेवला आहे.

२७ गावांतील नेत्यांना टोला

२७ गावांमध्ये सध्याच्या स्थिती स्वतंत्र नगरपालिका होण्याची शक्यता नाही. तेथील विकास पूर्ण होताच तेथे महापालिका होऊ शकते. नुकत्याच झालेल्या महासभेत या भागाला पाणी देण्यास शिवसेनेने विरोध केला होता, पण तो डावलून केवळ भाजपाने तेथील नागरिकांच्या पाण्यासाठी तातडीने कोटींची तरतूद केली. ही गावे महापालिकेत येऊन अवघी अडीच वर्षे झाली आहेत.

तेथील व्यवस्था समजून घेण्यातच दीर्घकाळ गेला. पण तेथे पूर्वापार असलेल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे रस्ते, पाणी, आरोग्य आदी मुलभूत गरजांपासून नागरिकांना वंचित रहावे लागले होते. म्हणूनच तेथील नागरिकांनी भाजपाला, शिवसेनेचे २१ नगरसेवक निवडून दिले, हे या नेत्यांनी विसरु नये, असा टोलाही सामंत यांनी या गावातील नेत्यांना लगावला.

Web Title:  BJP's claim on Kalyan Lok Sabha, Rajan Samant's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.