ठाणे लाेकसभेवर भाजपचा दावा ठाम,संजीव नाईक, संजय केळकर यांची नावे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 12:49 PM2023-11-05T12:49:47+5:302023-11-05T12:50:08+5:30
ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे.
ठाणे : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना ठाणेलोकसभा मतदारसंघावर भाजपने ठाम दावा केल्याची माहिती आहे. यापूर्वी कल्याण मतदारसंघावर भाजप दावा करेल, असे सांगितले जात असले, तरी कल्याणमध्ये विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे आहेत; परंतु ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडे उमेदवार नसल्यानेच भाजपने आपला दावा अधिक प्रबळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. भाजपने ठाण्यासह कल्याण लोकसभेवर दावा केला आहे. शिवसेना दोन गटांत विभागली गेल्याने त्याचा फायदा भाजप उठवू पाहत आहे. काही झाले तरी कल्याण मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो सोडण्याची तयारी शिवसेना (शिंदे गटाची) नाही. हा बालेकिल्ला आपल्याकडे राहावा, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पारडे जड असल्याने येथून भाजपच निवडणूक लढवणार, असा भाजपचा दावा आहे.
कल्याणच्या बदल्यात ठाणे; भाजपचा आग्रह
ठाणे लोकसभेवर दावा करताना भाजपचा युक्तिवाद असा की, शिवसेना जरी ठाणे हा बालेकिल्ला असल्याचे सांगत असली, तरी ठाणे लोकसभेचे खासदार उद्धव ठाकरे गटात आहेत. शिवसेनेकडे उमेदवार नाही. त्यामुळेच आता कल्याणच्या बदल्यात ठाणे असा भाजपचा आग्रह आहे.
भाजपमधून माजी खासदार संजीव नाईक, विद्यमान आमदार संजय केळकर, संदीप लेले, विनय सहस्रबुद्धे अशी काही नावे चर्चेत आहेत. आपल्यालाच तिकीट मिळावे, यासाठी नवी मुंबईतील एका इच्छुकाने थेट दिल्लीचे दार ठोठावल्याची चर्चा आहे.