सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभेवर भाजपचा दावा
By अजित मांडके | Published: April 4, 2024 05:09 PM2024-04-04T17:09:40+5:302024-04-04T17:09:51+5:30
ठाणे लोकसभा भाजपलाच का मिळावा त्याची काही महत्वाची कारणे देखील काही पदाधिकाऱ्यांनी पुढे केली आहेत.
ठाणे :ठाणे लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नाही. परंतु हा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याचा दावा शिंदे सेनेकडून केला जात असतांना आता भाजपने आता सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदार संघ हा शत प्रतीशत भाजपाच असल्याचा दावा सुरु केला आहे. त्यात ठाणे लोकसभा भाजपलाच का मिळावा त्याची काही महत्वाची कारणे देखील काही पदाधिकाऱ्यांनी पुढे केली आहेत. त्यामुळे ठाण्याची जागा कोणाला जाणार हे पाहणे आता निश्चितच महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे आणि कल्याणचे अद्यापही शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यात ठाणे लोकसभा शिवसेनेचाच लढणार असल्याचे शिंदे सेनेकडून ठासून सांगितले जात आहे. परंतु भाजपकडून देखील हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी दबाव वाढविला जात आहे. ठाण्यातील भाजपच्या स्थानिक मंडळींनी ठाण्यावर यापूर्वी देखील भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगितले आहे. भाजपला एक परांपरा आहे, परंतु मधल्या काळात युतीचा धर्म पाळतांना हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. परंतु आता भाजपची ताकद केवळ ठाण्यातच नाही तर जिल्ह्यातही वाढत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपचे १२ आमदार आहेत. त्यात विधानसभेचे ९ आणि विधानपरिषदेच्या ३ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई आणि मिराभार्इंदरवर भाजपचेच वर्चस्व आहे. ठाण्यातही भाजप कुठेही कमी दिसत नसल्याचा दावा भाजपच्या स्थानिक मंडळींकडून केला जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजप हा मोठा भाऊ असल्याने किमान दोन जागा भाजपला मिळाव्यात असा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यात भिवंडी नंतर ठाण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरु आहेत.
भाजपकडून वारंवार ठाणे लोकसभेवर दावा केला जात असतांना शिवसेना देखील ही जागा सोडणार नसल्याचे सांगत आहे. त्यात बुधवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उमेदवार कोणीही असला तरी आपल्याला मोदी यांनाच निवडून आणयाचे असल्याचा प्रचार शिवसेना आणि भाजपकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे उमेदवार कोणीही द्या आम्ही प्रचारात कुठेही मागे पडणार नसून उमेदवार जाहीर करावा अशी मागणी राष्टÑवादीने केली आहे. मोदींनाच जर निवडून आणायचे आहे, तर मग ठाणे लोकसभेवर शत प्रतिशत कमळच फुलले गेले पाहिजे अशी सोशल मिडियावर भाजपकडून चर्चा सुरु झाली आहे. ठाण्याची जागा जिंकायची असेल तर भाजप शिवाय पर्याय नसल्याचेही सांगितले जात आहे. भाजपच्या सोशल मिडियावर सध्या याच मुद्यावरुन जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा केल्याचेच यातून दिसत आहे. त्यामुळे आता ही जागा कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.