चांदीच्या विटांवरून भाजपतील वाद उफाळला; २११ पैकी उल्हासनगरातून केवळ दोनच विटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:25 AM2021-01-29T00:25:54+5:302021-01-29T00:26:13+5:30
राममंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान असावे याकरिता देशातील सिंधी बांधवांनी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली निधी गोळा केला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : अयोध्येतील राममंदिर उभारण्यासाठी सिंधी बांधवांनी एक किलो वजनाच्या २११ चांदीच्या विटा रामजन्मभूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोपविल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. दरम्यान, आयलानी यांनी उल्हासनगरमधून केवळ दोनच विटा दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. यामुळे नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. उर्वरित विटा या उभारण्यात आलेल्या निधीतून दिल्या असल्याचे रामचंदानी यांचे म्हणणे आहे. शहरात जर कार्यक्रम घेतला असता तर अधिक विटा, निधी मदत म्हणून गेला असता, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत आयलानी यांच्याशी संपर्क साधला असता मी आता गडबडीत आहे, नंतर बोलतो, अशी प्रतिक्रिया दिली.
देशातील नव्हे तर जगातील सिंधी समाज उल्हासनगरकडे वेगळ्या नजरेने पाहतो. आयलानी यांच्या आततायी स्वभावामुळे शहरातील सिंधी समाजाचे नाव बदनाम झाले असाही त्यांनी आरोप केला आहे. आयलानी यांच्यासमवेत शिष्टमंडळात भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, राजेश वधारिया, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, देवीदास भारवानी, विक्की लासी यांच्यासह विश्व सिंधी समागमचे सुहिरा सिंधी, देशातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.
राममंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान असावे याकरिता देशातील सिंधी बांधवांनी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली निधी गोळा केला. या निधीतून एक किलोच्या २११ चांदीच्या विटा राय यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी सुपूर्द केल्या. तसेच मंदिर उभारणीसाठी सिंधी समाज कधी व केव्हाही पुढे असेल, अशी माहिती आयलानी यांनी दिली. शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्याचे रामलल्ला मंदिर व राममंदिर बनविणाऱ्या कार्यशाळेला, हनुमानगडी, शरयू नदी आदींचे दर्शन घेतले. शहरातील बहुतांश सिंधी समाज उद्योगशील असून, मुंबई, दिल्ली, पुणे आदी शहरात उधोगधंद्यासाठी गेला.
सिंधी समाजाकडून मोठी मदत जाणार
देशात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरमध्ये वास्तव्याला आहे. राममंदिर उभारण्यासाठी मोठी मदत देण्याकरिता भविष्यात मोठा कार्यक्रम घेण्याचे संकेत भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी दिले आहेत. जी मदत दिली यापेक्षाही शहरातून मोठी मदत देण्याचा प्रयत्न सिंधी बांधवांचा असेल, असेही रामचंदानी यांनी सांगितले.