कल्याणमध्ये भाजपाचा शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा निर्णय; नरेश म्हस्केंनी दिली पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 04:27 PM2023-06-09T16:27:24+5:302023-06-09T16:27:38+5:30
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपाने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. ती आढावा बैठक कल्याण पूर्व येथे तिसाई देवी हॉलमध्ये संपन्न झाली. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना वाटते तेवढी त्यांची लोकसभा निवडणूक सोपी नसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाच्या या भूमिकेवर आता शिवसेनेचे प्रवक्ते (शिंदे गट) नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण लोकसभा मतसंघाबाबत स्थानिक भाजपाने घेतलेल्या भुमिकेविषयी बंद खोली आड चर्चा होणे गरजेचे आहे, असं नरेश म्हस्के यांनी सांगितले. येत्या १३ जूनला शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदार संघ निहाय आढावा बैठका होणार असल्याची माहिती देखील नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली. ठाणे, कल्याण लोकसभेची जागा शिवसेनेचाच लढवणार आणि भिवंडी लोकसभेची जागा भाजपाच लढणार असून या तिनही जागा निवडून येणार असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.