श्रेय लाटण्याची भाजपाला सवय, महापौरांची राज्यमंत्र्यांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:01 AM2018-02-27T02:01:51+5:302018-02-27T02:01:51+5:30
सत्ता भाजपाची असल्यामुळे निर्णय घेण्याचे काम सरकार करते. इतरांनी त्या कामाचा पाठपुरावा केल्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याची सवय भाजपा नेत्यांना आहे.
कल्याण : सत्ता भाजपाची असल्यामुळे निर्णय घेण्याचे काम सरकार करते. इतरांनी त्या कामाचा पाठपुरावा केल्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याची सवय भाजपा नेत्यांना आहे. ही सवय त्यांना लखलाभ असो, अशी टीका महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेने कधीही दुसºयाच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला नाही आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प मंजूर केल्याबद्दल शिवसेनेने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत, असे स्पष्ट केले आहे.
जलवाहतुकीचा प्रकल्प आणि मेट्रो रेल्वेसाठी पाठपुरावा केल्याचे वक्तव्य डोंबिवलीत झालेल्या पत्रकारांच्या दिलखुलास कार्यक्रमात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. मात्र, देवळेकर यांनी त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. जलवाहतूक व मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करून प्रकल्प मंजूर करण्यास सरकारला भाग पाडले. त्यावर चव्हाण यांनी टीका करणे हे बालीशपणाचे लक्षण आहे. जलवाहतुकीसाठी गडकरी यांनी ५०० कोटी मंजूर केले. त्यावेळी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे उपाध्यक्ष असलेले चव्हाण कुठे होते, असा सवाल देवळेकर यांनी केला. जलवाहतुकीचा मार्ग कसा व कुठून जातो हे तरी चव्हाण यांना ठाऊक आहे का, असा केला. ठाणे, भिवंडी, कल्याण मेट्रो मंजूर केल्यानंतर कल्याण ते तळोजा, तळोजा ते शीळ, शीळ ते ठाणे, असा मेट्रोचा कर्टल जोडण्यासाठी खासदार व पालकमंत्री शिंदे प्रयत्नशील आहेत. डोंबिवलीही त्यात जोडून मेट्रोच्या मॅपवर आणण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. डोंबिवली मेट्रोला जोडून घेतली गेली नव्हती, तेव्हा भाजपाचे नेते काय करत होते?, असा सवाल देवळेकर यांनी केला.
भाजपा-सेनेत जुंपली-
महापौरांच्या या वक्तव्यामुळे भाजपा व शिवसेनेत विकास कामावरून चांगले जुंपले असल्याचे चित्र समोर आले आहे. यापूर्वी मेट्रो रेल्वेच्या मुद्यावरून भाजपा खासदार कपिल पाटील व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात जुंपली होती.
तर अंबरनाथ येथील मलंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या विकास कामावर भाजपा आमदार किसन कथोरे व खासदार शिंदे यांच्यात जुंपली होती.
आता पुन्हा खासदारांनी ही कामे मंजूर करून घेतली. त्याच मुद्यावरून चव्हाण आणि देवळेकर यांच्यात जुंपली आहे.