‘ते’ समाजमंदिर तोडण्यामागे भाजपचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:09+5:302021-06-25T04:28:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भाईंदर : शांतीनगरमधील कलावती आईच्या भक्तांना भाडेतत्त्वावर दिलेले समाजमंदिर रिकामे करून तोडणे, रहिवाशांची हक्काची जागा कब्जाधारकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भाईंदर : शांतीनगरमधील कलावती आईच्या भक्तांना भाडेतत्त्वावर दिलेले समाजमंदिर रिकामे करून तोडणे, रहिवाशांची हक्काची जागा कब्जाधारकास बहाल करण्यात सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे संगनमत कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे. त्यामुळेच महासभेत प्रश्न उपस्थित केला असता प्रश्नोत्तराचा तासच सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्याचे सावंत म्हणाले.
बुधवारच्या महासभेत शांतीनगर येथील आरजीच्या मोकळ्या जागेत बेकायदा कब्जाविषयी सावंत यांनी महासभेत चर्चा होण्यासाठी ९ जून रोजी प्रशासनाला प्रश्न विचारले होते. १५ दिवस होऊनही प्रशासनाने उत्तर दिले नाही. पालिकेने बांधलेले समाजमंदिर कलावती आई उपासना मंडळास दिले होते. पण, पालिकेने त्यातील सामान पळवून नेले आणि समाजमंदिर जमीनदोस्त केले. महापालिकेच्या ताब्यातील जागेवर आठ महिन्यांपासून कब्जा झाला असताना सत्ताधारी, प्रशासन तक्रारी देऊनही कारवाई करीत नाही. महासभेत प्रश्न आल्यावर सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी पुढाकार घेऊन महापौरांकडून प्रश्न-उत्तरांचा तासच रद्द केला, असा आरोप सावंत यांनी केला. राहिवाशांना इमारतीची जागा त्यांची नसल्याच्या नोटिसा दिल्या गेल्या. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाईसाठी राज्य सरकारकडे तक्रार करू, प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे सावंत यांनी सांगितले.