शिवसेना-राष्ट्रवादीच्या वाक् युद्धात भाजपाची उडी; मंत्री जितेंद्र आव्हाडांवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 05:47 PM2022-01-16T17:47:04+5:302022-01-16T17:47:24+5:30
खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड यांनी काम करे बंदर और मार खाये मदारी, असे वक्तव्य केले होते.
ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कळवा खारेगाव रेल्वे उड्डाणपुलावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय नाट्य रंगले असतानाच, आता भाजपनेही त्यामध्ये उडी घेतली आहे. उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, मार खाये मदारी हे नेमके कोण? याबाबत गृहनिर्माणमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे, असे म्हणून त्यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. यामुळे ऐन थंडीमध्ये ठाण्यात राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात आव्हाड यांनी काम करे बंदर और मार खाये मदारी, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर भाजपचे ॲड. संदीप लेले यांनी बंदर कोणाला म्हणाले? हे आम्हाला चांगलेच समजते. पण मार खाये मदारी म्हणजे नेमके कोण? हे आव्हाड यांनी सांगावे. ते मंत्री आहेत. त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, त्यांनी ठाणे शहराच्या विकासाची कामे करावी, असे म्हणून लेले यांनी आव्हाडांवर निशाणा साधला.
आनंद परांजपेंची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका
खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयाची लढाई रविवारीही पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, असा टोला परांजपे यांनी लगावला. तर आपण ठिणगी लावली तर आग लागणारच, आम्ही शिवसैनिक आहोत, असा प्रतिटोला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी परांजपेंना लगावला.
खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर आधी मंत्री आव्हाड आणि नंतर कल्याणचे खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना परांजपे म्हणाले, आपल्या भाषणात स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पालकमंत्र्याचे आदेश धुडकवले आहेत. आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल, मात्र उड्डाणपुलाच्या आमचा पाठपुरावा असल्याचा पुनरुच्चार केला. खासदार शिंदे यांनी श्रेय घ्यावे मात्र, गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादीवर आघात झाला तर आपण प्रतिउत्तर देणारच असेही स्पष्ट केले.