ठाण्यात भारनियमनाविरोधात भाजपचे कंदिल आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2022 11:38 PM2022-04-24T23:38:20+5:302022-04-24T23:40:01+5:30
जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
ठाणे : राज्यातील छुप्या भारनियमनाविरुद्ध भाजपच्या वतीने रविवारी सायंकाळी महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयाबाहेर कंदिल आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी विजेचे भारनियमन आणि वाढीव सुरक्षा ठेवींचा निर्णय रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला.
जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच राज्यातील जनतेला भारनियमनात ढकलल्यासंदर्भात निषेध व्यक्त केला. तसेच सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी केली. तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.
सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्र अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे, असा आरोप आमदार केळकर तसेच डावखरे यांनी केला.
सामान्य ग्राहकाने एक बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जातो. सरकारी विभागांकडे महावितरणची कोट्यवधींची थकबाकी प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकारने थकबाकी महावितरणकडे भरावी. तसेच महावितरणने सुरक्षा अनामत रक्कम आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.