भाजपाची आघाडी फसली?
By admin | Published: May 1, 2017 06:26 AM2017-05-01T06:26:54+5:302017-05-01T06:26:54+5:30
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र आपली सत्ता स्थापन करून सर्वत्र पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या भाजपाच्या मनसुब्यांना
पंढरीनाथ कुंभार / भिवंडी
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र आपली सत्ता स्थापन करून सर्वत्र पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या भाजपाच्या मनसुब्यांना भिवंडीत खो बसला असून वेगवेगळे पक्ष फोडून त्यांची आघाडी करण्याचे प्रयत्न फसल्यात जमा असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वाखाली आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सोडून त्याऐवजी कोणार्क विकास आघाडीची मदत घेण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. कोणार्कने आधीच २२ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांना बळ द्यायचे आणि त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करायचे नाहीत, अशा निष्कर्षाप्रत भाजपाचे नेते आले आहेत.
भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही पक्षाच्या कमळ या निशाणीवर निवडणूक न लढविता कोणार्कच्या निशाणीवर निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेत भाजपाची सत्ता येण्यासाठी, वेगवेगळ््या समाजाची मते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी भाजपाने पावले उचलल्याचे मानले जाते.
भिवंडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्ष आणि काही मुस्लिम गटांत फूट पाडून त्यातील निवडून येण्याच्या क्षमतेचे नगरसेवक फोडायचे यासाठी भाजपाचे नेते गेली अडीच वर्षे आखणी करत आहेत. भाजपाला केंद्रात, वेगवेगळ््या राज्यांत आणि महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांत घवघवीत यश मिळाल्याने भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीवेळी इच्छुकांचा ओढा वाढेल, असा अंदाज त्या पक्षाच्या नेत्यांचा होता. उत्तर प्रदेशात काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या युतीला फारसे यश न मिळाल्याने भिवंडीत त्या पक्षांचे नेतेही भाजपात येतील, असे पक्षाने गृहीत धरले होते. मात्र भाजपात प्रत्यक्ष प्रवेश करण्यास किंवा कमळ चिन्हाखाली निवडणूक लढण्यास उमेदवारांनी फारशी उत्सुकता न दाखवल्याने भाजपाप्रणित आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र तिला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने भिवंडीच्या राजकारणात रूजलेल्या, इतर पक्षांना विश्वास वाटमाऱ्या कोणार्क विकास आघाडीशी समझोता करण्याचा निर्णय भाजपा नेत्यांनी घेतल्याचे समजते.
पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून भाजपा कार्यकर्त्यांनी कोणार्क विकास आघाडीच्या हक्काच्या मतदारसंघात विविध उपक्रम राबवून वर्चस्व निर्माण करण्याची तयारी केली. परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भिवंडीतील परिस्थिती किती अनुकूल असेल, याचा पुरेसा अंदाज आल्याने त्यांनी कोणार्क विकास आघाडीशी चर्चा सुरू केल्याने निष्ठावंत गट नाराज झाला आहे. अशीच तडजोड करायची होती, तर भाजपाने इतके दिवस केलेल्या कामाचे काय? कोणार्क आघाडीचे वर्चस्व मान्य करण्यामागे नेमके कोणते राजकारण आणि अर्थकारण आहे, अशी चर्चा लगेचच सुरू झाली. या निवडणुकीतील निर्णयाचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक खासदार कपिल पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे व्यूहरचना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. भिवंडीच्या मागील निवडणुकीत भाजपाचे आठ नगरसेवक निवडून आले होते आणि कोनार्क विकास आघाडीचे सात नगरसेवक निवडून आले होते. असे असताना महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीनंतर पहिल्या महापौर कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील बनल्या. त्यानंतर आलेल्या मोदी लाटेत प्रथमच भिवंडीत भाजपाचे खासदार कपील पाटील निवडून आले. त्यानंतर याच मोदी लाटेत प्रथमच भाजपाचे आमदार महेश चौघुले हे निवडून आले. त्यामुळे या परिसरात भाजपाचे मतदार वाढल्याचा निष्कर्ष पक्षाने काढला. कोणार्कचे सात नगरसेवक असतानाही त्यांना पालिकेत सत्तास्थापनेचचे गणित जुळवता आले. त्यामुळे त्यांची राजकीय समज, पुढे आलेल्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद, निर्णय घेण्यातील लवचिकता चांगली असल्याचे पक्षनेत्यांच्या लक्षात आले. कारण त्यापेक्षा एक जादा नगरसेवक असूनही भाजपाला सत्तेत सहभागाची संधी मिळाली नाही. उलट दुसरे महापौरपद शिवसेनेकडे गेले.
प्रभाग एक आणि सहामध्ये भाजपाने विविध कार्यक्रम राबविले. त्या तुलनेत कोणार्कच्या नगरसेवकांची कामे झाली नसल्याच्या तक्रारीच असल्याचे भाजपाचे मत होते. हे दोन्ही प्रभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे गड असल्याचे मानले जात असूनही या प्रभागात कोणार्क आघाडीसमोर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याने पक्षाचे कार्यकर्ते आश्चर्यचकीत झाले. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया जसजशी जवळ येईल, तशी भाजपाच्या निष्ठवंतांतील अस्वस्थता उफाळून येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोणार्कशी चर्चा सुरू : पाटील
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी निवडणुकीची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपविल्याने पक्षाच्या विजयाबाबत, पालिकेत सत्ता येण्याबाबत सर्व निर्णय मलाच घ्यायचे आहेत. आम्ही महानगरपालिकेच्या सर्व जागा लढविणार आहोत. पण कोणार्क विकास आघाडीशीही आमची चर्चा सुरू आहे. त्या बाबत अंतीम निर्णय झालेला नाही, असे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले.
भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनीही कोणार्क आघाडीशी चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. आम्ही महानगरपालिकेच्या ६० ते ७० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. मात्र कोणार्क विकास आघाडीसमोर उमेदवार द्यायचा की नाही, या बाबत चर्चा सुरू आहे असे ते म्हणाले.
निष्ठावंतांचा गोंधळ : खासदारांनी बोलावलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत इच्छुक असलेल्या सुगंधा टावरे यांनी आरडाओरड केली. बाहेरून पक्षात येणाऱ्यांचा विचार होतो आहे, पण दीर्घकाल पक्षात काम करून आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून काही काळ गोंधळ झाला.
खासदारांच्या
जोर-बैठका
भिवंडी महापालिकेत भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी काय करता येईल याच्या व्यूहरचनेसाठी खासदार कपिल पाटील यांनी रविवारी तळ ठोकला होता. त्यांनी दिवसभर जनसंपर्क कार्यालयात बैठका घेतल्या. त्याला पदाधिकाऱ्यांबरोबरच
इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यात काही उमेदवार निश्चित करण्यात आले. या बैठकीत खासदारांनी कोणार्क आघाडीचे पदाधिकारी, काँग्रेसमधील फुटीर गटांशीही चर्चा केल्याचे समजते. दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते मारूती देशमुख, नीलेश आळशी आणि दीपक वाणी यांनी भाजपात प्रवेश केला.