उल्हासनगर स्थायी समिती सभापतीपदी भाजपाच्या माखिजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:47 AM2018-04-05T06:47:23+5:302018-04-05T06:47:23+5:30
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या जया माखिजा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग क्रमांक ३ व ४ च्या सभापती पदासाठी अनुक्रमे साई पक्षाच्या ज्योती चैनानी व शिवसेनेच्या ज्योती माने यांचा
उल्हासनगर - महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या जया माखिजा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग क्रमांक ३ व ४ च्या सभापती पदासाठी अनुक्रमे साई पक्षाच्या ज्योती चैनानी व शिवसेनेच्या ज्योती माने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही सभापतीपदासाठी निवड झाली. मात्र प्रभाग क्रमांक १ व २ च्या सभापतीपदासाठी भाजपा विरूध्द ओमी टीम असा सामना रंगणार आहे. ही निवडणूक ११ एप्रिलला होणार आहे.
स्थायीसह प्रभाग समिती सभापतीपदासाठी बुधवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. स्थायी समितीत एकूण १८ सदस्यांपैकी भाजपा-ओमी टिमचे-७, साई-३, शिवसेना-५ व राष्ट्रवादी-१ असे बलाबल आहे. भाजपाच्या माखिजा यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने विरोधी पक्षातील शिवसेनेने स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केला नाही. माखिजा यांच्या अर्जावर ओमी टीमचे पंचम कलानी व राजेश वधारिया यांचे अनुमोदन असून एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदाची निवड निश्चित आहे. भाजपा-ओमी टीमच्या करारानुसार स्थायी समिती सभापतीपद ओमी टीमकडे गेले होते. मात्र ऐनवेळी माखिजा यांचे नाव भाजपाने पुढे केले असून ओमी टीमनेही अखेर पाठींबा दिला.
प्रभाग समिती क्रमांक -१ च्या सभापतीपदी भाजपाचे सोनू छापू तर ओमी टीमकडून हरेश जग्यासी यांचा अर्ज आला.
तसेच प्रभाग- २ च्या सभापतीपदासाठी ओमी टीमकडून शुभांगिनी निकम, भाजपाकडून लक्ष्मी सिंग, रिपाइंचे भगवान भालेराव, साई पक्षाचे पप्पू गुप्ता असे ४ अर्ज दाखल झाले. भाजपा व ओमी टीमपैकी कुणाचे उमेदवार अर्ज मागे घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग समिती १ व २ मध्ये भाजपा व ओमी टीमच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने, त्यांच्यात सभापतीपदावरून जुंपली आहे.
सत्ताधारी व विरोधकांत एकमत?
सत्ताधारी पक्षातील भाजपा-ओमी टीम, साई तर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना यांच्यात चर्चा होऊन एकमेकांविरोधात उमेदवार न देण्याचे ठरले अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. त्यामुळेच स्थायी समिती सभापतीपदासह प्रभाग ३ व ४ सभापतीपदाची बिनविरोध निवड झाली. प्रभाग १ व २ मध्येही शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. भाजपा व ओमी टीमचे उमेदवार सभापतीपदासाठी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने त्यांच्यातील वाद पुन्हा चव्हाटयावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.