भाजपाच्या मिलिंद पाटणकर यांचे नगरसेवकपद धोक्यात , पालिकेच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:08 AM2018-02-27T02:08:33+5:302018-02-27T02:08:33+5:30
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाटणकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस काढण्याच्या तयारी प्रशासनाने केल्याची माहिती पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाटणकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस काढण्याच्या तयारी प्रशासनाने केल्याची माहिती पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
युएलसी कायद्यानुसार दुर्बल घटकांसाठी- ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे, अशी अट असताना पाटणकर यांनी २०१० साली या कायद्यानुसार माजिवडा येथे दोन सदनिका घेतल्या असून त्यांची अंदाजे किंमत अडीच लाख इतकी आहे. त्यानंतरही त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे एक आणि अन्य बहुउद्देशीय सदनिका घेतली असून ही सर्व मालमत्ता त्यांनी पालिकेच्या परवानगीशिवाय एकत्रित केल्याने ही नोटिस काढण्यात येणार असल्याने पाटणकर यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा घटनाक्रम पाहता ठाणे महापालिकेत पालिका आयुक्त आणि भाजपामधील संघर्ष कमी होण्याविषयी वाढत असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवकांनी ंविरोधात भूमिका घेतल्याने व्यथित झालेल्या आयुक्तांनी ठाण्यात न राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष करून भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी पालिकेच्या वतीने पोलिसांना बुलेट देण्याच्या प्रस्तावाला विरोध करून सभा तहकुबीची मागणी केली होती. तरीही सभा रेटून नेण्यात प्रशासन, शिवसेना, राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळे हा संघर्ष तीव्र झाला होता. २०१३ सालीही पालिकेच्या परवानगीशिवाय मालमत्ता एकत्रित केल्याबद्दल पालिका प्रशासनातर्फे पाटणकर यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर २० फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेतही भाजपच्या नगरसेवकांनी सभा तहकूब न केल्याने तसेच त्यांना बोलू न दिल्यामुळे सभात्याग केला होता. मात्र सभा संपल्यावर काही वेळातच त्यांच्याविरोधात एमआरटीपीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता तर त्यांचे नगरसेवकपदच धोक्यात येण्याची चिन्हे असून ते रद्द करण्यासंदर्भात त्यांना प्रशासनातर्फे नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात मिलिंद पाटणकर यांच्याशी संपर्क साधल्यावर, मी कोणत्याही प्रकारच्या यूएलसी फ्लॅटची मागणी केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासकांनी ते फ्लॅट दिले असून आमच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर अशा प्रकारचे दोन यूएलसी फ्लॅट असून सर्वांनीच ते फ्लॅट एकत्र केले आहे. अंतर्गत बदल केल्याने ठाणे पालिकेचे प्रशासन जर माझ्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करत असेल तर आमदार, बहुतांश नगरसेवक तसेच शहरातील ९९ टक्के नागरिकांनी अशाप्रकारचे अंतर्गत छोटे बदल केले आहेत. मग मलाच आयुक्त्यांकडून टार्गेट का केले जात आहे? मी केवळ अंतर्गत भिंती तोडल्या असून यात एफएसआयचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेच्या अनियमित कारभाराबाबत केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मी आवाज उठवला असून त्या अधिकाराचा वापर मी यापुढेही करत राहणार आहे.
प्रशासनाने नगरसेवकपद रद्द करण्याची नोटीस काढल्यानंतर तिचा अभ्यास करून यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या सभागृहातील कामकाजावरून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्यातील वादाने आता वेगळे वळण घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महापौर आणि आयुक्तांमध्ये वाद झाला होता.
त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती. पण भाजपमधील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आयुक्त आणि गटनेत्यांच्या वादात अद्याप मध्यस्थी करण्याची भूमिका घेतल्याचे ऐकिवात नसल्याने या वादाने गंभीर वळण घेतले आहे.