भाजपाच्या सूचनापेट्या काढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:38 AM2017-07-26T00:38:30+5:302017-07-26T00:39:04+5:30
मीरा रोड : ‘मेरा शहर मेरा सुझाव’ या निवडणूक प्रचारासाठी भाजपाने भार्इंदर रेल्वे स्थानकात बेकायदा लावलेल्या सूचनापेट्या रेल्वे सुरक्षा दलाने काढून टाकल्या. बेकायदा पेट्या लावण्याह रेल्वेच्या आवारात आचारसंहिता काळात परवानगी न घेताच केलेल्या प्रचार प्रकरणी रेल्वे प्रशासन व आचारसंहिता पथकने फौजदारी कारवाईची मागणी सत्यकाम फाउंडेशनने केली आहे. त्यामुळे शहरभर भाजपाने लावलेल्या सूचनापेट्या व त्या ठेऊन चाललेल्या प्रचाराबाबत पालिका व आचारसंहिता पथक पुन्हा संशयाच्या भोवºयात सापडले आहे.
रेल्वे स्थानक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता, नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सूचना पेट्या ठेऊन प्रचार करत आहेत. अनेक दुकाने, हातगाड्या, सोसायटीच्या ठिकाणीही सूचना पेट्या ठेवल्या आहेत. शहरात पाच हजार सूचना पेट्या ठेवल्याचे स्वत: मेहतांनीच पत्रकार परिषदेत म्हटले होते. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या जिन्यावर भाजपाने सूचनापेटी लावली होती. त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री व आमदारांचे छायाचित्र असून निवडणूक चिन्ह आहेत.
सत्यकाम फाउंडेशनचे प्रमुख कृष्णा गुप्ता यांनी याबाबत भार्इंदर रेल्वे स्थानकात आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेचच रेल्वे सुरक्षा दलाने भाजपाची सूचनापेटी काढून जप्त केली. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी गुप्ता याने केली आहे.
- वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही
भार्इंदर रेल्वे स्टेशन मास्तर कार्यालयाशी संपर्क साधला असता जिन्यावर लावलेली बेकायदा पेटी काढून टाकण्यात आली असल्याचे सांगितले. पुढील कारवाईबाबत वरिष्ठांकडून आदेश येतील त्यानुसार कार्यवाही करू असे सांगण्यात आले.