भाजपाचे उद्योजक खेचण्याची सेनेची खेळी

By admin | Published: April 16, 2017 04:27 AM2017-04-16T04:27:55+5:302017-04-16T04:27:55+5:30

मुंबई व ठाण्यात महापालिका निवडणुकांत भाजपासोबत राहिलेल्या गुजराती-जैन समाजांशी जुळवून घेण्याचा आणि त्यांना शिवसेनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न पक्ष

BJP's pulling out the entrepreneur | भाजपाचे उद्योजक खेचण्याची सेनेची खेळी

भाजपाचे उद्योजक खेचण्याची सेनेची खेळी

Next

- स्रेहा पावसकर,  ठाणे
मुंबई व ठाण्यात महापालिका निवडणुकांत भाजपासोबत राहिलेल्या गुजराती-जैन समाजांशी जुळवून घेण्याचा आणि त्यांना शिवसेनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने सुरू केला आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनच्या (जितो)च्या ठाणे शाखेच्या उद्घाटनानिमित्त तब्बल ६०० जैन उद्योजकांनी हजेरी लावली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली आणि शाखेचे उद्घाटन केले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि मुंबई व ठाणे महापालिकांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांत गुजराती-जैन समाजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिली. परिणामी, मुंबईत शिवसेनेच्या तोलामोलाचे यश भाजपाला मिळाले, तर ठाण्यातही भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली. मुंबईत जातीय दंगे झाले, तेव्हा शिवसेनेने तुमचे रक्षण केले, असे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने प्रचारात सांगत होते. नोटाबंदीमुळे हा समाज भाजपाला मते देणार नाही, असा शिवसेनेचा कयास होता. परंतु, तरीही हा समाज मोदी व भाजपासोबत राहिला. ठाणे शहरात व्यापाऱ्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. त्याला भाजपाची फूस होती, अशी चर्चा आहे. शिवसेनेतील काही वाचाळ नेत्यांनी कष्टाने व्यापार, उद्योगात प्रगतीपथावर राहिलेल्या या समाजावर टीका केली. मात्र, अशा वांझोट्या टीकेमुळे काही साध्य होणार नाही, हे शिवसेनेच्या काही नेत्यांच्या लक्षात आले असून आता शिवसेनेने जैन समाजासोबतचे आपले संबंध सुधारण्याची रणनीती अमलात आणण्याचे ठरवले असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
भारतात जितोच्या एकूण ५२ शाखा आहेत. ठाण्यातील शाखेच्या उद्घाटनाचा रंगतदार सोहळा आशर आयटी पार्क येथे पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांसह महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक आवर्जून उपस्थित होते.जितो पेक्सचे चेअरमन मोतीलाल ओसवाल आणि जितो पेक्सचे अध्यक्ष शांतिलाल कावर, जितो ठाणेचे सल्लागार अजय आशर, महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्केहेही उपस्थित होते. यावेळी जितो ठाणे शाखेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. महेंद्र जैन यांनी या शाखेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ठाणे शाखेच्या महिला विंगच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अंजू आशर यांनी स्वीकारली.
‘ठाण्याच्या विकासात जैन समाजाचे योगदान मोलाचे असून हा सात्त्विक समाज आहे. व्यापार करण्याबरोबरच धार्मिक आणि सामाजिक कार्य ते करत असतात’, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाण्यातील व्यापार आणि उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी ठाण्यात ज्या कन्व्हेंशन सेंटरची मागणी केली आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तलावांच्या शहरात आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, बैठका झालेल्या आम्हालाही पाहायच्या आहेत. जितोच्या सहकार्याने हे सेंटर पूर्ण होईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
या रंगतदार सोहळ्याला जितो मुंबई झोनचे अध्यक्ष सुखराज नाहर यांच्यासह प्रवीण छेडा, भारत मेहता आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सांस्कृतिक कार्यक्रमही रंगले होते. (प्रतिनिधी)

१४६ आयएएस अधिकारी केले तयार : ट्रेनिंग फाउंडेशन (जेएटीएफ) हा ‘जितो’चा स्वत:चा खास प्रकल्प असून राज्य तसेच राष्ट्र पातळीवर प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी होतकरू तरु णांना प्रोत्साहित करण्यास आणि संधी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत १४६ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकारी तयार झाले आहेत. जेएटीएफव्यतिरिक्त ही संस्था जैन समाजाच्या विकासासाठी इतर २३ उपक्र मांच्या माध्यमातून कार्यरत आहे.

Web Title: BJP's pulling out the entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.