भाजपाविरोधातील धर्मनिरपेक्ष आघाडीत जागावाटपाचा तिढा

By Admin | Published: May 3, 2017 05:46 AM2017-05-03T05:46:46+5:302017-05-03T05:46:46+5:30

इतर पक्षातील निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार फोडून भाजपाप्रणित आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न फसल्याने

BJP's secular front against the alliance | भाजपाविरोधातील धर्मनिरपेक्ष आघाडीत जागावाटपाचा तिढा

भाजपाविरोधातील धर्मनिरपेक्ष आघाडीत जागावाटपाचा तिढा

googlenewsNext

भिवंडी : इतर पक्षातील निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार फोडून भाजपाप्रणित आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न फसल्याने भाजपाने कोणार्क विकास आघाडीची समझोता करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्याविरोधात काँग्रेसप्रणित आघाडीची मोट बांधण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनीही त्याला सहमती दर्शवली होती. काँग्रेसच्या नेत्यांनाही अशी आघाडी हवी असली तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून गाडे अडले आहे.
तिन्ही पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटप हा फारसा गंभीर मुद्दा नाही. प्रत्येक पक्षाकडे सध्या ज्या जागा आहेत, त्या त्यांच्याकडे राहतील. गरजेनुसार त्यातील एखाद-दुसरी जागा बदलली जाईल किंवा पॅनेल पद्धतीप्रमाणे एखादा उमेदवार कमी पडत असल्यास तेथे अन्य पक्षांची मदत घेतली जाईल आणि अन्य जागा त्यात्या पक्षाची ताकद, प्रभाव आणि निवडून येण्याच्या क्षमतेनुसार वाटल्या जातील, यावर प्रथामिक चर्चा झाली आहे. मात्र आताच तिन्ही पक्षांनी जागावाटप जाहीर केले, तर नाराज उमेदवारांच्या फाटाफुटीचा धोका उद््भवू शकतो. त्यामुळे शेवटच्या दिवशी तिन्ही पक्ष आपापल्या जागांनुसार एबी फॉर्मचे वाटप करून हा प्रश्न निकाली काढतील. त्यामुळे आघाडीबाबत कोणताही नेत थेट भाष्य करण्यास तयार नाही.
या आघाडीत काँग्रेसने ५० जागा मागितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने काँग्रेसला वगळून वेगळी आघाडी करण्याची तयारीही सुरू केली. मात्र यातून धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट होईल. त्यामुळे काँग्रेसने आपली जागांची मागणी कमी करावी, यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. पण त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसने आपल्या विद्यमान जागांवरील उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदच खूप मर्यादित झाल्याने त्यांना वरिष्ठांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्याचपद्धतीने समाजवादी पक्षानेही उमेदवारांची चाचपणी केली आहे. (प्रतिनिधी)


नाराजांचा धोका सर्वांनाच
पॅनेल पद्धतीची निवडणूक असल्याने एकाच कुटुंबातील, एकाच पक्षातील उमेदवार देण्याकडे सर्व पक्षांचा कल आहे. आपल्या पॅनेलमधील अन्य उमेदवारांचा खर्च पेलण्याची इतरांची तयारी नसल्याने प्रभागातील चारही जागांवरील उमेदवार आपल्याच मर्जीतील मिळावेत, अशी प्रभावी उमेदवारांची अपेक्षा आहे. ज्यांची अपेक्षा पूर्ण होईल, ते पक्षासोबत राहतील.
उरलेले वेगळ््या पक्षाचा आधार घेतील. अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास प्रत्येक उमेदवाराला वेगळे चिन्ह मिळते. त्यातून प्रचारात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे इतर पक्षांचा आधार घेऊन निवडणूक लढवण्याचीही नाराजांची चाचपणी सुरू आहे.
त्यासाठी मनसे, एमआयएम, बहुजन विकास आघाडी अशा छोट्या पक्षांकडे उमेदवारांचा ओढा आहे आणि त्या पक्षांनीही अशा नाराजांसाठी आमचे
दरवाजे खुले आहेत, असे यापूर्वीच जाहीर केले आहे.


काँग्रेसचा वरचष्मा
मनोज म्हात्रे हत्या प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भिवंडीत भेटी देऊन परिस्थितीचा अंदाज घेतला होता. त्यानंतर या हत्या प्रकरणाच्या आधारे कपिल पाटील यांची कोंडी करण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता. त्यातील नारायण राणे यांच्याबद्दल काँग्रेसचा एकही नेता सध्या बोलण्यास तयार नाही. मात्र अन्य नेत्यांनी मागील २७ जागांच्या बळावर काँग्रेसप्रणित आघाडीला होकार दिला होता. पण काँग्रेसने ९० पैकी ५० जागांवर दावा केल्याने या आघाडीच्या चर्चेला खीळ बसली आहे. त्या खालोखाल समाजवादी पक्षाकडे १७ जागा होत्या आणि राष्ट्रवादीकडे नऊ. त्यामुळे या आघाडीवर स्वाभाविकपणे काँग्रेसचा वरचष्मा असेल, असे गृहीत होते. समाजवादी पक्षाच्या १७ पैकी १५ विद्यमान नगरसेवकांनी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीला काही जागा वाढवून देऊन काँग्रेसशी समझोत्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मर्जीतील नगरसेवक तयारीत
ज्या नगरसेवकांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे, अशांना नेत्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यास आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे भरण्यास सांगितले आहे. त्यातील एबी फॉर्म वगळता अन्य कागदपत्रांसाठी त्यांची धावपळही सुरू झाली आहे.
अद्याप अर्ज नाहीत
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस शनिवार, ६ मे आहे. अर्ज आॅनलाइन पद्धतीने भरून त्याचे प्रिंट सादर करायचे आहे. मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. मुस्लिम समाजातील बहुसंख्य उमेदवार शुक्रवारी, ५ मे रोजी अर्ज भरतील; तर अन्य उमेदवार शनिवारी, शेवटच्या दिवशी अर्ज भरतील असे मानले जाते. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांतच राजकीय चित्र स्पष्ट होईल.
एमआयएम कोणासोबत?
एमआयएमची भिवंडीतील ताकद मर्यादित आहे. त्यांच्या शनिवारच्या सभेलाही अपेक्षेइतकी गर्दी झाली नव्हती. त्यामुळे एमआयएम स्वबळावर न लढता काही जागा पदरात पाडून घेऊन एखाद्या आघाडीसोबत लढेल, अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: BJP's secular front against the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.