भाजपचा शंखनाद, तर शिवसेना, मनसेचा ट्विटरद्वारे श्रावणमास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:31+5:302021-09-02T05:27:31+5:30
स्टार ११२४ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : सध्या श्रावण सुरू असला तरी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आपल्या ...
स्टार ११२४
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सध्या श्रावण सुरू असला तरी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील आमदार-खासदार या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. त्यातही भाजप रस्त्यावर उतरून मंदिरांसमोर शंखनाद करून आंदोलन करून आघाडी सरकारचा निषेध करत आहेत. शिवसेना खासदार तसेच मनसेचे आमदार हे श्रावणात सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मदिरालय सुरू असून मंदिरे मात्र बंद, अशी टीका करत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत, तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिमेला मंदिरांच्या समोर शंखनाद करून सरकारवर घणाघात केला. त्यापाठोपाठ आता मनसेनेही मंदिर उघडा, टाळे काढा, अशी हाक देत मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी मात्र श्रावणात सोशल मीडियाद्वारे तसेच थेट समाजकार्य करून, कोरोनासंदर्भात मदतकार्य करून श्रावण मास यशस्वी केला आहे.
-------------------
बहुतांश आमदार ॲक्टिव्ह
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते सर्वच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टला युवा वर्ग तत्काळ लाइक करतो, तर कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांचेही बहुसंख्य फॉलोअर आहेत. आव्हाड हे सोशल मीडियावर एखाद्या विषयावर काय भाष्य करतात, याकडे अनेकांचे लक्ष्य असते. कल्याण पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे आहेत. त्यामुळे ते सोशल मीडियावर फारसे हिट नसले तरी नागरिकांना समस्या असेल तर कायदा सुव्यवस्थेवर अभ्यासातून आणि त्यावर थेट, परखडपणे टीका टिपण्णी करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे जनसंपर्कावर भर देतात, कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हेदेखील मतदारसंघात प्रवास करून समस्या जाणून घेण्यावर भर देतात. त्यामुळे सोशल मीडियावर कमी अधिक प्रमाणात सगळे असले तरी सगळ्यांचा मूळ गाभा हा जनसंपर्क आहे, हे मात्र निश्चितच नोंद करण्यासारखे आहे.
-------------
ट्वीट आवर्जून जातात वाचले
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील नेट सॅव्ही असून मतदारसंघ, राज्य, देश पातळीवरील बहुतांश सामाजिक विषयांवर त्यांचे ट्वीट आवर्जून वाचले जाते. कोणताही हिंदू सण तसेच सर्वधर्मीयांचे सण, उत्सव असो त्यांचा शुभेच्छा संदेश निश्चितच सगळ्यांना मिळतो. याखेरीज मतदारसंघात जनता दरबार घेऊन ते थेट सामान्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यावर भर देतात. तसेच संबंधित अधिकारी, यंत्रणांना ते थेट काम करण्याबाबत सूचना देतात.
----------
सण उत्सवांचे अपडेट्स
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे देखील नेटवर अलीकडच्या काळात ॲक्टिव्ह असल्याचे दिसून येते. काम करण्याची रांगडी पद्धत अशी पाटील यांची ओळख असून रिझल्ट हवाच, अशी आग्रही भूमिका त्यांची असते. सर्वधर्मीय नागरिकांना ते सहकार्य करण्याची भूमिका बजावतात. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी त्यांनी ५१ लाख रुपयांची भरीव मदत कार्यावरून सोशल मीडियावर त्याची चर्चा खूप रंगली होती. मंत्री झाल्यापासून त्यांचे सोशल मीडियावर श्रावणातील सण उत्सवांचे अपडेट्स येत आहेत.