संघटनाबांधणीत भाजपाचा शिवसेना पॅटर्न

By admin | Published: July 1, 2017 07:38 AM2017-07-01T07:38:18+5:302017-07-01T07:38:18+5:30

निवडणुकीत महत्त्वाची असते, ती पक्ष संघटना. मीरा भार्इंदरमध्ये भाजपाची पक्ष बांधणी सर्वात भक्कम असून ती शिवसेनेपेक्षा भक्कम आहे.

BJP's Shiv Sena Pattern | संघटनाबांधणीत भाजपाचा शिवसेना पॅटर्न

संघटनाबांधणीत भाजपाचा शिवसेना पॅटर्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : निवडणुकीत महत्त्वाची असते, ती पक्ष संघटना. मीरा भार्इंदरमध्ये भाजपाची पक्ष बांधणी सर्वात भक्कम असून ती शिवसेनेपेक्षा भक्कम आहे. त्या उलट शिवसेनेने संघटनाबांधणीकडे लक्षच न दिल्याने येथील यंत्रणा भाजपाच्या तुलनेत खिळखिळी आहे. त्यांना निवडणुकीच्या काळात बाहेरून कुमक मागवावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाला टक्कर देण्यास निघालेल्या शिवसेनेला पुरेसे संघटनाबळ नसल्याचा मोठा अडथळा पार पाडावा लागण्याची चिन्हे आहेत.
भाजपाकडे येथे तबब्ल ३२ आघाड्या-सेल आहेत, तर ७२०० सक्रीय सदस्य असून मिस्ड कॉलद्वारे शहरात तब्बल ८० हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी झाली आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ गटांगळ्या खात आहे, तर काँग्रेसचा हातही अस्तित्वासाठी आधार शोधतोय. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजकीय वातावरण बदलून गेले आहे. शहरात भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची जी एकतर्फी हवा होती ती देखील कमी झाली आहे.
निवडणुक जिंकण्यासाठी साम-दाम-दंडाचा वापर होत असला, तरी नियोजन आणि संघटनाही महत्त्वाची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मेंडोन्सा पराभूत झाले त्यास संघटना बळकट नव्हती, हे देखील मोठे कारण आहे. परंतु नरेंद्र मेहता यांची वादग्रस्त प्रकरणे बाजूला ठेवली तर त्यांनी संघटनाबांधणीचे महत्व ओळखले. त्यासाठी त्यांना ठाण्याचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत उर्फ अण्णा आशिनकर यांची मौलिक साथ मिळाली. ७३ वर्षीय अण्णांचा भार्इंदरशी संबंध भाजपामुळे १९९८ पासूनचा. जिल्हा चिटणीस, सरचिटणीस, विभागाचे चिटणीस व कोकण विभाग प्रशिक्षण सेवेचे प्रमुख असा संघटना बांधणीचा दांडगा अनुभव असलेल्या अण्णांनी मेहतांचे भाजपा कार्यालय तसेच पक्ष बांधणीची जबाबदारी घेतली.
मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाच्या मुख्य पक्ष संघटनेसह महिला आघाडी, युवा मोर्चा आदी सात प्रमुख सेल आहेत. या शिवाय मेहतांनी तब्बल २५ नवे सेल बनवले. भाजपाचे ७ हजार २०० सक्रिय सदस्य झाले, तर भाजपाने देशपातळीवर ‘मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य बना,’ या मोहीमेत एकट्या मीरा-भार्इंदरमधून तब्बल ८० हजार लोकांनी भाजपाचे प्राथमिक सदस्य बनण्यासाठी मिस्ड कॉल दिले होते. त्याचा डाटा स्थानिक भाजपा कार्यालयाकडे आल्यानंतर त्या आधारे आतापर्यंत ४० हजार भाजपा सदस्यांची पडताळणी करण्यात आली. आता तर मिस्ड कॉल देऊन सदस्य बनलेल्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे आभार मानण्यासह त्यांना रीतसर सदस्य करुन घेण्याचे काम मोठ्या जोमाने सुरु आहे. ते पाहता भाजपाची संघटना किती भक्कम आहे, याचा अंदाज येऊ शकेल.
पालिका निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी शिवसेना सरसावली असून खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम हे चौघे एकत्र फिरत असल्याने सेनेची वातावरण निर्मिती चांगली होत आहे. पण केवळ वातावरण निर्मितीवर निवडणुका जिंकणे सोपे नाही. सेनेकडे पक्ष संघटनाच बळकट नाही.
मुंबई-ठाण्यात शिवसेनेची जी भक्कम पक्ष बांधणी आहे, तशी बांधणी मीरा-भार्इंदरमध्ये नाही. प्रताप सरनाईक हे गेली सात वर्षे येथील आमदार आहेत. शिवाय मीरा-भार्इंदरचे संपर्कप्रमुख पण आहेत. परंतु शहरात त्यांनी संघटना बांधणीकडे दुर्लक्षच केले. खास करुन त्यांनी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघाकडे पाठ फिरवली, अशी खंत खुद्द शिवसैनिक व्यक्त करतात.
आजच्या घडीला शिवसेनेकडे शाखा प्रमुखांपासून उप जिल्हाप्रमुख पदांपर्यंत तसेच महिला आघाडी, युवासेना मिळून अवघे ६०० पदाधिकारी आहेत. गटप्रमुखांसह शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीची संख्यादेखील सरनाईक यांच्या कार्यालयातून मिळू शकली नाही.
निवडणुकीत घरोघरी जाऊन मतदार नोंदणी, पडताळणी, मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे, मतदान केंद्रातील प्रतिनिधी आदी महत्वाची जबाबदारी गटप्रमुख पार पाडतात. स्थानिक मतदारांशी त्यांचा थेट संपर्क व ओळख असते. शिवसेनेत गटप्रमुखाला मान सन्मान आहे. पण शिवसेनेचा कणा असलेला गटप्रमुखच मीरा-भार्इंदरमध्ये दुर्लक्षित आहे. दरम्यान, २०० गटप्रमुख तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ८ जुलैला सर्व गटप्रमुखांचा मेळावा आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: BJP's Shiv Sena Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.