भिवंडी पंचायत समिती सभापती निवडणूकीत भाजपाच्या सभापती तर मनसेच्या उपसभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 09:21 PM2018-01-08T21:21:08+5:302018-01-08T21:57:18+5:30
भिवंडी पंचायत समितीवर भाजपा-काँग्रेसची युती शिवसेनेचे स्वप्नभंग,पंचायत समितीवर कुणबी राज
भिवंडी पंचायत समिती सभापती निवडणूकीत चिठ्ठीची किमया
काँग्र्रेस सदस्यांमुळे भाजपाच्या सभापती तर मनसेच्या उपसभापती
भिवंडी : भिवंडी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज दुपारी झालेल्या निवडणूकीत भाजपा व शिवसेना उमेदवारास समसमान मते मिळाली.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांव्दारे उचललेल्या चिठ्ठी मधून सभापती पदावर रविना रविंद्र जाधव यांची निवड झाली तर शिवसेना पुरस्कृत मनसे उमेदवार वृशाली रविंद्र विशे यांची उपसभापतीपदी निवड झाली.सभापतीसाठी चिठ्ठीमधून भाजपाला कौल मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.या घटनेमुळे शिवसैनिकांचा कमालीचा धक्का बसला असुन त्यामुळे पंचायत समितीवर राज्य करण्याचे स्वप्नभंग झाले.
आज झालेल्या भिवंडी पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणूकीसाठी पालकमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी आज सकाळपासून शहरात ठाण मांडले होते. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या निवडणूकीचा निकाल भाजपाच्या पारड्यात गेल्याने स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भिवंडी पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपचे १९सदस्य, शिवसेनेचे १९, काँग्रेस २, मनसे १ व राष्ट्रवादी काँग्रेसचे १ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी काँग्रेसच्या सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून आयत्यावेळी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणूकीत चुरस निर्माण झाली होती.भाजपाच्या गटात गेलेल्या काँग्रेस सदस्यांना येनकेन प्रकारे भाजपापासून अलिप्त करण्याचा काँग्रेस वरिष्ठांचा प्रयत्न देखील या काँग्रेस सदस्यांनी फोल ठरविला.
आज सोमवार रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात महिलांसाठी आरक्षीत सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शशीकांत गायकवाड यांनी सुरू केली. सभापती पदासाठी भाजपा तर्फे रवीना रविंद्र जाधव, शिवसेनेतर्फे विद्या प्रकाश थळे व ललिता प्रताप पाटील ह्या तीन महिला उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.त्यानंतर ललिता पाटील यांनी माघार घेतल्याने रिंगणात शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी एक असे दोन उमेदवार शिल्लक राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत गायकवाड यांनी सभापती पदासाठी उपस्थित सदस्यांचे हात उंचावून घेतलेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना समान २१-२१ मते मिळाली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमार्फत ईश्वरीय चिठ्ठी काढण्यात आली. तेंव्हा चिठ्ठीतून भाजपास कौल मिळून भाजपा उमेदवार रविना रविंद्र जाधव ह्या निवडून आल्या.
त्यानंतर झालेल्या उपसभापती पदासाठी वृशाली रविंद्र विशे,ललीता प्रताप पाटील,संध्या पंडीत नाईक व रविना रविंद्र जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी संध्या पंडीत नाईक व रविना रविंद्र जाधव यांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने मनसेच्या वृशाली विशे व ललीता पाटील यांचा थेट सामना झाला. त्यांना देखील समान २१-२१ मते मिळाली. तेंव्हा त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या उडविण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांकडून काढलेल्या चिठ्ठीत मनसेला कौल मिळाला आणि मनसेच्या वृषाली रवींद्र विशे ह्या निवडून आल्या. या निवडणूकीत पंचायत समितीमध्ये कुणबी समाजाला सभापतीपद देण्याची आग्रही मागणी पुढे आली होती.त्यामुळे खासदार कपिल पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केल्यानंतर कुणबी समाजाच्या रवीना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर मनसेच्या एकमेव सदस्या वृशाली विशे ह्या देखील कुणबी समाच्या असल्याने भिवंडी पंचायत समितीवर कुणबीराज प्रस्थापीत झाले आहे.
भिवंडी पंचायत समितीच्या भाजपाच्या नवनिर्वाचित सभापती रविना रविंद्र जाधव यांचे खासदार कपील पाटील,ग्रामिण जिल्हा प्रमुख दयानंद चोरघे व तालुका प्रमुख पी.के.पाटील यांनी अभिनंदन केले.तर या विजयाचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले.
काँग्रेसच्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या प्रचारासाठी मनपाचे महापौर जावेद दळवी,शहराध्यक्ष शोएब गुड्डू खान आदि शहरातील मान्यवरांनी पुढाकार घेतला होता.त्यामुळे आज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूकीत काँग्रेस भाजपा बरोबर राहिली ते चित्र उद्या महानगरपालिकेत पाहावयास मिळेल.,अशा प्रतिक्रीया शहरातील राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत.