महाविकास आघाडी करणार भाजपची कोंडी; भाजपचा एक सदस्य होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:04 AM2020-02-08T01:04:08+5:302020-02-08T01:04:27+5:30
परिवहन समिती निवडणूक
ठाणे : परिवहन समितीची दोन वर्षांपासून रखडलेली निवडणूक येत्या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची समीकरणे आणखी घट्ट होणार असून, भाजपची कोंडी करण्याचा निर्धार केला आहे. संख्याबळानुसार परिवहन समितीमध्ये भाजपचे दोन सदस्य जाणे अपेक्षित असले तरी, महाविकास आघाडी एकत्र आल्याने भाजपचा एकच सदस्य निवडला जाणार आहे.
दोन वर्षांपूर्वी परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर, पक्षीय बलाबलानुसार परिवहन समिती हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेनेने निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता परिवहनच्या उर्वरित सहा सदस्यांचाही कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे.
परिवहन समितीवर १२ सदस्य निवडले जातात. स्थायी समिती सभापती हा या समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. दोन वर्षांपूर्वी सहा सदस्य निवृत्त झाले. यामुळे सहा सदस्यांवरच समितीचा कारभार सुरू आहे. दोन वर्षांत सभापतीही या समितीला लाभू शकलेला नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे आता महापालिकेची गणितेही बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे महापालिकेत भाजपची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.
राष्ट्रवादीच्या सदस्याला सभापतीपद?
पक्षीय बलाबलानुसार भाजपचे परिवहनमध्ये दोन सदस्य निवडून जाणे अपेक्षित आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आघाडीचा एक सदस्य वाढून भाजपचा एक सदस्य कमी होणार आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या सदस्याला परिवहन समितीचे सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.