पाटील यांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:54 AM2019-04-13T00:54:26+5:302019-04-13T00:54:36+5:30
सशर्त माघार : मुख्यमंत्री, कपिल पाटील, किसन कथोरे यांची मध्यस्थी
मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी काँगे्रसविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बंडखोरी ही केवळ काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार नव्हती, तर कुणबीसेनेचे प्रमुख असल्याने ते कुणबी मते घेऊन भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचाही विजयरथ रोखण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून पाटील यांची बंडखोरी भाजपने शमवली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पुढाकारापश्चात पाटील यांनी काही अटींवर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे.
विश्वनाथ पाटील यांनी २००९ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ८९ हजार मते पडली होती. ही मते कुणबीसेनेच्या जोरावर त्यांनी घेतली होती. २०१४ साली त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी लढवली. तेव्हा त्यांना तीन लाख मते मिळाली होती. ही मते केवळ काँग्रेसची नव्हती, तर त्यामध्ये कुणबी मतांचाही समावेश होता. यावेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह कपिल पाटील यांच्याशी जवळीक साधली. त्यांची मुंबईत भेटही झाली. भेटीपश्चात विश्वनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भाजपच्या सांगण्यावरूनच दाखल केल्याची चर्चा काँग्रेसकडून व्यक्त केली गेली; मात्र प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी भाजपसाठीही अडचणीची ठरू शकत होती. कुणबी समाजाचा मतदार हा सामाजिक बांधीलकी म्हणून कुणबीसेनेच्या उमेदवाराकडे वळला असता आणि त्याचा फटका भाजपला बसला असता.
विश्वनाथ पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याने त्यांची बंडखोरी शमवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही. कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि वाडा परिसरांत वर्चस्व असलेले भाजप आमदार कथोरे यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. कथोरे यांनी पाटील यांच्यासमवेत गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी कपिल पाटील हेदेखील उपस्थित होती.
यावेळी विश्वनाथ पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांच्या मागणीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ठाणे व कोकण परिसरातील सिंचनासाठी निधी देण्याचे, कुणबी आर्थिक विकास महामंडळास निधी देण्याचे आणि विधान परिषद व राज्यसभेत कुणबीसेनेला प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले. पेसा कायद्यातील आरक्षणाचा विचार करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. आपण मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला कुणबीसेनेचा पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीत कुणबीसेना घटक पक्ष असेल, अशी मान्यता कुणबीसेनेला दिली आहे. कुणबीसेनेचा पाठिंबा राज्यभरातील सर्व महायुतीच्या उमेदवारांना असेल, असे पाटील यांनी सांगितले.
कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील महायुतीच्या उमेदवारांना कुणबीसेनेने पाठिंबा दिल्याने विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.