आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचा भाजपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:01 AM2019-02-27T00:01:50+5:302019-02-27T00:01:59+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांना ब्रेक लावण्याच्या आणि प्रशासनावर टीकास्त्र सोडणाऱ्या १० ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांना ब्रेक लावण्याच्या आणि प्रशासनावर टीकास्त्र सोडणाऱ्या १० नगरसेवकांना काळ््या यादीमध्ये टाकण्याच्या आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निर्णयाचा ठाणे शहर भाजपाने पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आयुक्त आडमूठी भूमिका घेऊन बसले तर त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशाराही भाजपाने दिला.
मुख्यमंत्र्यांच्या पाठींब्यामुळे शहरात विकास कामे करीत असल्याचा दावा आयुक्त करीत असतात आणि त्यांच्याकडूनच विकास कामे थांबवली जात असतील तर ते चुकीचे असल्याचे मत भाजपाचे गटनेते नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केले. आयुक्तांनी दिलेले तोंडी आदेश मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. आयुक्तांच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध सर्व नगरसेवकांनी एकत्र येण्याचे आवाहन भाजपाने केले आहे. यावेळी नगरसेवक संजय वाघुले, प्रतीभा मढवी, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. शुक्रवारच्या महासभेत दिवा डम्पींग, थ्रीडी नकाशांसह ई गव्हर्नस, फाईल टेबल टू टेबल ट्रॅक करणे, मोबाइल अॅपच्या माध्यमातून शहरातील विकास कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आयुक्तांनी आणलेले प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी तहकूब ठेवल्याने आयुक्त उद्विग्न झाले.
यापूर्वी स्थायी समितीने मंजूर केलेले विकास कामांचे, युटीडब्ल्युटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रस्ताव अशा सुमारे ८०० कोटींच्या मंजूर झालेल्या प्रस्तावांना त्यांनी ब्रेक लावण्याचा निर्णय सोमवारी घेतला. तसेच १० नगरसेवकांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. अशा पध्दतीने ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने वर्तन करणे चुकीचे आहे. आयुक्तांनी शुक्रवारी सादर केलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रशासनाकडून अपेक्षित उत्तरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळेच या प्रस्तावांना विरोध करण्यात आल्याची माहिती पाटणकर यांनी दिली.
महासभेत भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करुन प्रस्ताव मंजूर करणे, माहिती न घेता प्रस्ताव मंजूर करणे, त्यासाठी अवाजवी किमंत मंजूर करणे असे धोरण नगरसेवक महासभेत राबवू शकत नाहीत. त्यामुळेच आता सर्व नगरसेवकांनी एकत्र यावे, अशा आशयाचे पत्र इतर पक्षातील नगरसेवकांना पाठवण्यात आल्याची माहिती गटनेते पवार यांनी दिली.
चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव मंजूर झाले तर न्यायालयात जाण्याचा इशारा पवार यांनी दिला. सर्व नगरसेवक एकत्र आले तर आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभेतही विचारला जाब : मंगळवारी झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या मनमानी विरोधात आवाज उठवला. विकास कामांचे प्रस्ताव रोखून धरणे चुकीचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालिका प्रशासनाने यासंदर्भात उत्तर देताना, विकास कामांचे सरसकट प्रस्ताव रोखण्यात आले नसून केवळ ज्या निविदांमध्ये संगनमत करुन गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्याच प्रस्तावांची अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती छाननी करणार असल्याचे सांगितले आहे.
परंतु कार्यादेश दिलेले आणि निविदा अंतिम झालेले प्रस्ताव रोखून धरणे चुकीचे असल्याचे मत पाटणकर आणि पवार यांनी व्यक्त केले. वास्तविक ज्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, त्या कामांचा निविदा समिती, छाननी समिती आणि लेखापरीक्षकांकडून अभ्यास झालेला असतो, त्यानंतरच कार्याध्येश दिले जातात. मात्र आता त्या कामांना रोखणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.