कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा शिक्षक आमदार निवडून आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:12+5:302021-09-07T04:48:12+5:30
डोंबिवली : शिक्षकांच्या अनेक समस्या माजी शिक्षक आमदार स्व. रामनाथ मोते यांनी विधिमंडळात शासनाशी संघर्ष करून सोडविल्या. आता ...
डोंबिवली : शिक्षकांच्या अनेक समस्या माजी शिक्षक आमदार स्व. रामनाथ मोते यांनी विधिमंडळात शासनाशी संघर्ष करून सोडविल्या. आता मात्र शिक्षकांना कोणी वाली उरला नसून बापट व मोते सरांची पोकळी भरून काढण्यासाठी हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्या ताब्यात आणून आपलाच शिक्षक आमदार निवडून आणू, असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
भाजपच्या शिक्षक आघाडी, शिक्षण संघर्ष संघटना, क्रीडा भारती, जुनी पेन्शन योजना समिती, कोकण-मुंबई मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या शिक्षक नोंदणी जागृती-संपर्क अभियानाच्या शुभारंभप्रसंगी रविवारी पवार बोलत होते. यावेळी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, क्रीडा भारती संघटनेचे महादेव क्षीरसागर, जुनी पेन्शन योजना समितीचे रोहित पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, अभिनव विद्यामंदिराचे मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी प्रास्ताविक केले. सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन कोकण विभागातील सहा जिल्ह्यांतील प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहाेचणार असल्याचे बोरनारे म्हणाले. यावेळी कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.