‘कोणार्क’कडे भाजपाची पाठ

By admin | Published: May 16, 2017 12:12 AM2017-05-16T00:12:14+5:302017-05-16T00:12:14+5:30

गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती

BJP's text to Konark | ‘कोणार्क’कडे भाजपाची पाठ

‘कोणार्क’कडे भाजपाची पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : गोकुळनगरमध्ये राणीसती मैदानावर कोणार्क आघाडीच्या आठ उमेदवारांसाठी रविवारी रात्री झालेल्या सभेकडे भाजपा कार्यकर्त्यांनी सपशेल पाठ फिरवल्याने त्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसून आले. या युतीसाठी आग्रह धरणारे खासदार कपिल पाटील एकटेच सभेला हजर होते. वाट पाहूनही गर्दी न जमल्याने अखेर जादूचे खेळ करून गर्दी जमवावी लागली आणि दोन तास उशिराने कशीबशी सभा सुरू झाली.
या सभेला सभेत खासदारांसह माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील, आमदार महेश चौघुले, कोणार्कचे आठ उमेदवार आणि जैन समाजातील प्रतिष्टीत नेते हजर होते. भंवरलाल जैन व गुलाबचंद जैन यांनी रस्त्यावरील मटणाची दुकाने आतील बाजुला स्थलांतरित करावी, ही मागणी लावून धरली. जैन धर्मगुरू आणि साध्वी शहरात येताना प्रत्येक मार्गावर त्यांना अशी दुकाने दिसतात. त्यामुळे ती स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. मात्र विलास पाटील यांनी ही दुकाने हटवण्याबाबत ठोस आश्वासन दिले नाही. जैन साधूंना गोकुळनगरमध्ये येतानाच्या मार्गावरील मटणाची दुकाने दिसू नयेत, म्हणून वंजारपट्टीवरील पुलाचा एक रॅम्प या मार्गावर उतरवल्याचे त्यांनी समाजाच्या निदर्शनास आणले.
गोकुळनगरमध्ये पाणी नसल्याने टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो, हेही जैन यांनी लक्षात आणल्यावर नेत्यांनी त्याची कबुली दिली. चॅलेंज ग्राऊण्डवर खेळ संपल्यानंतर जाणाऱ्या प्रेक्षकांच्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी यावेळी भाजपा आणि कोणार्कच्या नेत्यांकडे करण्यात आली. मात्र त्यावर कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही.
काँग्रेसवल्यांची सोच गंदी असल्याने त्यांनी पुन्हा शहरात कत्तलखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, भाजपा कार्यकर्ता आणि बजरंग दलाने तो प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती विलास पाटील यांनी दिली.
कोणार्कचे निवडणूक चिन्ह असलेल्या टीव्हीचा उल्लेख करून भाजपा खासदार कपील पाटील यांनी मोदींचे दर्शन व्हावे, यासाठी टीव्ही चालू करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांसाठी मेट्रो सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि पक्षातर्फे दिल्या गेलेल्या इतर विकासकामांचा, आश्वासनांचा आढावा घेतला. महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी झाल्याने भिवंडीतही आता मटणाच्या दुकानांपासून कुणाला त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणार्क आघाडीचा उमेदवार जिंकला, तरी तो आपलाच आहे, असे सांगत त्यांनी नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला.

Web Title: BJP's text to Konark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.