प्रभाग समित्यांवर भाजपाचा वरचष्मा, भाईंदर पालिका, शिवसेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 05:47 AM2017-10-20T05:47:46+5:302017-10-20T05:48:07+5:30
मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक पॅनल पद्धतीने झाली. यावेळी एकूण २४ प्रभाग अस्तित्वात आले. यामुळे अस्तित्वातील प्रभाग समित्यांची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सोमवारी झालेल्या महासभेत चर्चेसाठी आला.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक पॅनल पद्धतीने झाली. यावेळी एकूण २४ प्रभाग अस्तित्वात आले. यामुळे अस्तित्वातील प्रभाग समित्यांची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सोमवारी झालेल्या महासभेत चर्चेसाठी आला. सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर बदल करुन सर्व प्रभाग समित्या आपल्याच हाती राखण्यात यश मिळवले. यातील प्रभाग समिती
३ व ५ पासून अनुक्रमे शिवसेना व काँग्रेसला दूर ठेवल्याने भाजपाच्या बहुमतापुढे विरोध करणारी सेना व काँग्रेस अल्पमतात राहिली.
पॅनल पद्धतीमुळे प्रशासनाने अस्तित्वातील एकूण सहा प्रभाग समित्यांच्या भौगोलिक रचनेत बदल करण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यात भार्इंदर पश्चिमेकडील प्रभाग समिती कार्यालय १ अंतर्गत प्रभाग ८, २३ व २४ तर २ अंतर्गत प्रभाग १, ६ व ७ समाविष्ट करण्यात आले. भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग समिती कार्यालय ३ अंतर्गत प्रभाग २, ३, ४, ५ व ११ तर ४ अंतर्गत प्रभाग १०, १२, १३ व १८ समाविष्ट करण्यात आले. तसेच मीरा रोडमधील प्रभाग समिती कार्यालय ५ अंतर्गत प्रभाग ९, १९, २०, २१ व २२ तर ६ अंतर्गत १४, १५, १६ व १७ समाविष्ट केले. यातील भार्इंदर पश्चिमेकडील प्रभाग १, ६, ७, ८, २३ व २४ मधील एकूण २३ जागांपैकी भाजपाला १९ व सेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रभाग समिती १ व २ मध्ये भाजपाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग २, ३, ४, ५, १०, ११, १२, १३ व १४ मधील एकूण ३६ जागांपैकी भाजपाला सर्वाधिक २३ जागा तर सेनेला १३ जागा मिळाल्या आहेत. यानुसार प्रभाग समिती ३ व ४ मध्येही भाजपाचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले असले तरी प्रभाग समिती ३, ४ अंतर्गत असलेला प्रभाग १० समाविष्ट करण्याची सूचना सेनेकडून करण्यात आली. यामुळे भाजपाची सदस्य संख्या कमी होऊन त्यात सेनेचे वर्चस्व वाढणार असल्याचे लक्षात येताच भाजपाने त्याला विरोध करुन प्रशासनाचा प्रभाग समिती ३ व ४ चा प्रस्ताव जैसे थे ठेवला. त्याला सेनेने जोरदार विरोध केला. मीरा रोडमधील प्रभाग ९, १५, १६, १७, १८, १९, २०, २१ व २२ मधील एकूण ३६ जागांपैकी भाजपाला २०, काँग्रेसला १२ तर सेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. प्रभाग समिती ५ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाने त्यातीलच काँग्रेसचे बालेकिल्ले ठरलेले प्रभाग ९ व १९ प्रभाग समिती ६ मध्ये समाविष्ट करण्याचा ठराव मांडला.
भाजपाच्या या ठरावाला काँग्रेसने विरोध दर्शवून सत्ताधारी भाजपावर मनमानी कारभाराचा आरोप केला. यामुळे उठलेल्या गदारोळात उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दोन्ही विरोधी पक्षांना नसलेली ताकद कशाला दाखवता, असा टोला लगावून जागेवरच बसण्याचे आवाहन केले. यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.
प्रशासनाने सादर केलेल्या ठरावाला भाजपाने केराची टोपली दाखवून बहुमताच्या जोरावर प्रभाग समितीच्या भौगोलिक रचनेत बदल करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तो आक्षेपार्ह असून तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. राज्य सरकारने त्याची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागू. - अनिल सावंत, नगरसेवक काँग्रेस