काळे पांढरे पट्टे आता लाल पांढरे हाेणार..! ठाण्यातील तीनहात नाका येथे प्रयोग यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:44 AM2023-12-23T06:44:22+5:302023-12-23T06:44:31+5:30
तीनहात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात सध्या काही महत्त्वाच्या तसेच अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी येथील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे. आधी पांढरा-काळा अशा स्वरूपात असलेला रंग आता पांढरा - लाल अशा स्वरूपात दिसू लागला आहे.
तीनहात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे झेब्रा क्रॉसिंगवर आता कोणी वाहने थांबवीत नसून चुकून थांबली गेली तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात यापूर्वी सिग्नलच्या ठिकाणी किंवा इतर महत्त्वाच्या तसेच रहदारीच्या रस्त्यांवर पांढऱ्या-काळ्या स्वरूपात झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे होते. काही ठिकाणी आजही ते कायम ठेवले आहेत; परंतु आता ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे रंग बदलले आहेत.
याठिकाणी हाेणार प्रयोग
पहिल्या टप्प्यांत तीनहात नाका नंतर कॅडबरी जंक्शन, पुढे माजिवडा आणि इतर महत्त्वाच्या चौकातही हा प्रयोग केला जाणार आहे.
सध्या तीन हात नाका, कोपरीतील काही महत्त्वाच्या रस्त्यांसह, राम मारुती रोड आदींसह इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे.
पूर्वी नागरिकांना पांढरे - काळे स्वरूपातील झेब्रा क्रॉसिंग फारसे दिसत नव्हते. तसेच नियमांचेही उल्लघंन केले जात होते; परंतु आता पांढऱ्या - लाल स्वरूपातील या पट्यांमुळे वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग करीत नाहीत, तसेच झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे राहिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाते.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे शहर पोलिस, वाहतूक शाखा