शिक्षकदिनी ‘काळा दिन’ आंदोलन; अनेक वर्षे मागण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:08 AM2020-09-07T00:08:44+5:302020-09-07T00:08:52+5:30
काळ्या फिती लावून केले काम
पालघर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने डहाणू तालुक्यातील एम.के. ज्युनिअर कॉलेज, चिंचणी येथे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम करून काळा दिन आंदोलन करण्यात आले.
मूल्यांकनासाठी पात्र घोषित, अघोषित शिक्षकांना वेतन अनुदान देणे, दशकाहून अधिक काळापासून वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पद मंजुरी व वेतन अनुदान देण्यात यावे, आय.टी. शिक्षकांना वेतन श्रेणीत वेतन देण्यात यावे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, दहा, वीस, तीस वर्षांनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, आदी मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.
आपल्या कोणत्याही मागण्या मान्य होत नसल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी पसरली आहे. या रास्त मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महासंघाने शासनाला यापूर्वीच दिला होता. असे संघटनेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुनील बैसाणे यांनी सांगितले.
संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष प्रा. हरीश वळवी, युनिट प्रमुख प्रा. सूरज आष्टेकर, प्रा.सीताराम बांडे आणि प्रा. मंगेश ठेपणे यांनी डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांना दिले. शासन मागण्या मान्य करत नसल्यामुळे शिक्षकांनी शिक्षक दिनी काळा दिन आंदोलन केले.
यासंदर्भात १८ फेब्रुवारी २०२० रोजी शिक्षक संघटनेबरोबर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेऊन एक महिन्याच्या आत सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. अनेक वेळा स्मरणपत्र व चर्चेसाठी विनंती करूनदेखील मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी २६ मे रोजी एक दिवसाचा उपवास करून, आॅनलाईन 'आत्मक्लेश' आंदोलन करून शासनाचा निषेध केला होता.