ओएनजीसीला काळे झेंडे; मच्छिमारांकडून सर्वेक्षण बोटीला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 10:58 PM2019-02-01T22:58:40+5:302019-02-01T22:59:04+5:30
मच्छीमार एकवटले; तहसीलदार कार्यालयांवर मोर्चे
पालघर : मच्छीमारांशी कुठलीही चर्चा न करता त्यांच्या ‘गोल्डन बेल्ट’ क्षेत्रातच ओएनजीसीकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यांच्या नुकसान भरपाईबाबत शासनस्तरावरून कुठल्याही हालचाली होत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या उत्तन ते डहाणू भागातील शेकडो मच्छीमार बोटींना शुक्रवारी सर्वेक्षण बोटीला घेराव घातला. तर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चे काढण्यात आले.
ओएनजीसी कंपनी कडून १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी असा ५६ दिवसांचा समुद्राच्या भूगर्भातील तेल व वायू शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करण्यापूर्वी तीन महिने आधी ओएनजीसी ने मच्छीमार प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या समितीची बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र समिती अथवा कुठल्याही मच्छीमार संघटना, सहकारी संस्थांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील वसई ते डहाणू दरम्यानच्या मच्छीमारांनी शुक्र वारी सकाळीच आपल्या बोटी समुद्रातील सर्वेक्षण रोखण्यासाठी रवाना केल्या आहेत.
वसईच्या समुद्रात १५ ते २० नॉटिकल मैलावर हे सर्वेक्षण सुरू असल्याने वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील शेकडो मच्छीमार पुरु ष-महिलानी किनाऱ्यावर हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाद्वारे शासनाचा निषेध करीत समुद्रात सर्वेक्षण रोखण्यासाठी जात असलेल्या बोटींना निरोप दिला. तर एडवण, केळवे, टेम्भी, वडराई, सातपाटी आदी किनारपट्टीवरील मच्छीमारांनी पालघर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, मच्छीमार कृती समितीच्या ज्योती मेहेर, राजन मेहेर, सुभाष तामोरे, संतोष मेहेर, रमेश बारी, धनंजय मेहेर, जयप्रकाश मेहेर, किशोर मेहेर, विश्वास पाटील, जगदीश नाईक, रवी मेहेर, हर्षदा तरे, आदींसह शेकडो महिलांचा सहभाग असलेल्या मोर्चेकºयांनी तहसीलदार कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. यावेळी तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आल्या नंतर रामदास संधे आदींनी आपले विचार मांडले.
त्या नंतर मोर्चेकºयांनी आपला मोर्चा मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे वळवीत त्यांना गराडा घातला. जिल्हाधिकारी कार्यालयावर १४ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाºयांनी पालघर-डहाणू आणि वसई-उत्तन च्या मच्छीमारामध्ये हद्दीवरून सुरू असलेल्या संघर्षा बाबत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु १० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही बैठकीचे आयोजन करण्यात न आल्याने संतप्त मच्छीमारांनी सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांना धारेवर धरले. आपण जिल्हाधिकाºयांशी या विषयावर चर्चा करून येत्या आठ दिवसात बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन पाटील यांनी दिले. पण जर आठ दिवसाच्या आत बैठकीचे आयोजन न केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मोर्चेकºयांनी दिला.