पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:25 PM2024-07-11T12:25:24+5:302024-07-11T12:25:59+5:30

सरकारच्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Black market of urea fertilizer in Palghar district once again exposed | पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर

पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर

हितेन नाईक, पालघर:-  जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला असून डहाणू तालुक्यातील गंजाड( मनिपुर) येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे.औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यात प्रक्रिया करण्यासाठी युरिया खताचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.

डहाणू तालुक्यातील गंजाड मनिपुर येथे युरिया खताचा मोठा साठा दडवून ठेवण्यात आल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या नंतर कृषी विभागाला जाग आली.त्यावेळी एका गोदामात दडवून ठेवलेल्या 60 पोते युरिया खत जप्त करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मते, सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असली तरीही ग्रामीण भागात अशा प्रकारे काळाबाजार होत आहे. सरकारच्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 

प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या युरिया खताचा साठा काळ्या बाजारात चढ्या  दराने विक्री केला जात असल्याच्या तक्रारी होत असताना हा काळाबाजार रोखण्यात जिल्हा कृषी अधीक्षक नेहमीच अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक निलेश भागेश्वर यांच्या देखरेखी खाली नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये एक जिल्हास्तरीय व आठ तालुक्यांसाठी आठ तालुकास्तरीय पथके निर्माण करण्यात आली आहेत.कृषी निविष्ठा उपलब्धतेसाठी जिल्ह्यात एकूण नऊ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून गुण नियंत्रक निरीक्षक अर्धवेळ म्हणून 25 तर पूर्णवेळ म्हणून एक असे एकूण 26 निरीक्षक नेमण्यात आले आहेत.एव्हडी कागदोपत्री भक्कम व्यवस्था युरिया,बियाणे, खते ह्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्माण केली असताना हा काळाबाजार रोखण्यात कृषी विभाग नेहमी प्रमाणे सपशेल अपयशी ठरत आहे. ह्या युरिया खताच्या काळाबाजारा मध्ये अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी सामील राहत असल्याने त्यांना मोठा राजकीय वरदहस्त लाभत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तारापूर,वाडा आदी औद्योगिक वसाहती मधील कारखान्यात चढ्या भावाने शेतकऱ्यांचा युरिया बेकायदेशीर मार्गाने कारखानदारांच्या कारखान्यात बिनबोभाट पोहचवला जात आहे.सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काळाबाजार च्या अशा घटनां पालघर जिल्ह्यात नेहमीच घडत असतात आणि ह्याचा मोठा फटाका शेतकऱ्यांना बसत असतो.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत घोरखना, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश भुरभुरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी सापळा रचत हा गैरव्यवहार उघडकीस  आणून जिल्ह्यात नेमलेली ९ भरारी पथके कुचकामी असल्याचे दाखवून दिले आहे.कृषी विभागाने सोपस्कार म्हणून पुढील तपासणीसाठी सॅम्पल घेतले असून, जिल्हा कृषी अधिकारी काय कारवाई करतात हे पुढे दिसून येणारं आहे.


"आम्हाला योग्य दरात युरिया मिळत नसताना आमचा युरिया खत काळाबाजार रात पोहचते कसे?ह्यामागे कोणती यंत्रणा काम करते ह्याचा तपास लागला पाहिजे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी.

लाहानी दौडा- स्थानिक शेतकरी

Web Title: Black market of urea fertilizer in Palghar district once again exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर