खरीप हंगामात अंबरनाथ तालुक्यात यंदा काळा भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:24+5:302021-05-28T04:29:24+5:30
बदलापूर : बळीराजाला आणि नागरिकांना असे दोघांनाही अतिशय लाभदायक असलेल्या काळ्या भाताचे वाण तालुका कृषी खात्याच्या पुढाकाराने तयार ...
बदलापूर : बळीराजाला आणि नागरिकांना असे दोघांनाही अतिशय लाभदायक असलेल्या काळ्या भाताचे वाण तालुका कृषी खात्याच्या पुढाकाराने तयार करण्यात यश आले आहे. खरीप हंगामासाठी पाचशे किलो काळ्या भाताचे वाण तयार केले आहे. त्यामुळे यंदा प्रथमच अंबरनाथ तालुक्यात सुमारे अडीच टन काळ्या भाताचे उत्पन्न येऊ शकेल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाचे तंत्र बिघडले आहे. कधी जास्त पाऊस तर कधी कमी पाऊस, यामुळे खरीप हंगामातील भात हे मुख्य पीक कमालीचे बेभरवशाचे झाले आहे. गेल्या वर्षी हातातोंडाशी आलेले पीक पावसाळा लांबल्याने वाया गेले होते. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने अभ्यास करून अतिवृष्टीतही तग धरू शकणाऱ्या काळ्या भाताचे वाण स्थानिक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.
यंदा अंबरनाथ तालुक्यात काही निवडक शेतकऱ्यांना कृषी विभागाने उन्हाळी हंगामात काळ्या भाताचे २५ किलो बियाणे लागवडीसाठी दिले होते. त्यापासून आता ५०० किलो काळ्या भाताचे बियाणे तयार झाले आहे.
या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे काळा तांदूळ हा आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे, त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मधुमेहीसुद्धा हा भात खाऊ शकतात, त्यामुळे काळा भात हा नागरिकांच्या हिताचा आहे. काळा भात कितीही जोरात पाऊस पडला तरी तो शेतात उभा राहतो. या भाताच्या पिकाची उंची पाच ते सहा फूट इतकी असते, तसेच या भाताचा पेंढा अधिक काटक असतो. पूरजन्य परिस्थिती अथवा अतिवृष्टीतही तो वाकत नाही. त्यामुळे काळ्या भाताचे पीक वाया जात नाही. सर्वसाधारण तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ शेतकऱ्यांना जवळपास दुप्पट भाव मिळवून देतो. त्यामुळे काळ्या भाताची लागवड करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. साध्या भात लागवडीतून शेतकऱ्यांना प्रति किलो २० ते २५ रुपये मिळतात. काळा तांदूळ पन्नास रुपये किलो भावाने विकला जातो. बाजारात या तांदळाचा ८० ते १०० रुपये किलो भाव आहे. परिणामी, काळा भात हा शेतकऱ्यांना जसा लाभदायक आहे तसाच तो नागरिकांच्या हिताचा आहे.
अंबरनाथ तालुक्यातील चांदप येथे उन्हाळी हंगामात लावलेल्या काळ्या भाताची कापणी करण्यास प्रारंभ करण्यात आला.
-------------
फोटो आहे.