काळाकुट्ट धूर, अग्निलोळ अन् उरी धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:21 AM2020-02-19T01:21:17+5:302020-02-19T01:21:41+5:30

डोंबिवलीत भयकंप : एमआयडीसीतील कंपनीला आग; शाळांमधील विद्यार्थ्यांना सोडले घरी

Black smoke, flames and fury fire in mumbai | काळाकुट्ट धूर, अग्निलोळ अन् उरी धडकी

काळाकुट्ट धूर, अग्निलोळ अन् उरी धडकी

Next

सचिन सागरे 

डोंबिवली : मंगळवारची दुपार एमआयडीसी फेज दोनमध्ये भीषण अग्नितांडवाची ठिणगी पडली... मेट्रो पॉलिटियन एक्झिम कंपनीत ज्वाळा उठल्या आणि जेवणाच्या सुटीत डबे खायला बसलेले कामगार ते तसेच टाकून सैरावैरा बाहेर पळाले... कंपनीतील सायरन धाय मोकलून वाजू लागल्याने आजूबाजूच्या वस्त्यांमधील रहिवाशांना काहीतरी आक्रित घडल्याची जाणीव झाली... काळाकुट्ट धूर, डोळे दिपवून टाकणाऱ्या ज्वाळा आणि त्यांना भेदून टाकण्याकरिता धडपडणारे पाण्याचे फवारे यांचा सामना रात्रभर सुरू होता. हृदयाचा थरकाप उडवणारे स्फोट या परिसरातील लोकांच्या कानात होतच राहिले.

साधारण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कंपनीतील कामगारांची जेवणाची सुटी संपते. त्यामुळे काही कामगार जेवणाचे डबे उघडून जेवत होते तर काही कंपनीच्या आवारात फिरत होते. तेवढ्यात कंपनीतील गोदामाला आग लागल्याचा आरडाओरडा सुरु झाला. चार-सहा कामगार हाताला मिळेल ती भांडी घेऊन पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी फणा काढला आणि गोदामाला आपल्या कवेत घेतले. आगीचे हे भीषण रुप व काळ््याकुट्ट धुराचा गुदमरुन टाकणारा विळखा घट्ट होण्यापूर्वीच कामगारांनी कसाबसा जीव वाचवला.
कंपनीला आग लागल्याची माहिती डोंबिवली अग्निशमन विभागाला मिळताच जेमतेम २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन विभागाच्या पहिल्या गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कंपनीमध्ये असलेले केमिकलचे ड्रम्स फुटण्यास सुरुवात झाल्याने दुसºया गाडीला बोलावण्यात आले. मात्र, या गाडीला घटनास्थळी यायला सुमारे ४५ मिनिटे लागले. कारण एकतर आग लागल्याचे समजाच बघ्यांनी सैरावैरा धावत या कंपनीच्या चोहोकडे गर्दी केली. अनेक रहिवासी इमारतींमधून कंपनीच्या दिशेनी आले आणि जवळील रस्त्यावरील वाहनांचाही आगीची दृश्ये मोबाईलमध्ये टिपण्यामुळे वेग मंदावला. आगीने रौद्ररुप धारण केले.
कंपनीत केमिकलचा प्रचंड साठा होता. केमिकलचा ड्रम आगीच्या संपर्कात येताच त्याचा स्फोट होऊ लागला. त्याचे मोठाले आवाज कानावर आदळू लागले. हे आवाज इतके कर्कश्य होते की, अनेकांच्या कानांच्या कानाला दडे बसले. या आवाजांमुळे कंपनीच्या जवळ येऊन आगीची ‘गंमत’ पाहत असलेले चार हात मागे गेले.
कंपनीच्या जवळ असलेल्या शाळेतील लहानगी मुले या आवाजांनी भेदरली. काही रडू लागली. त्यामुळे शाळेत हलकल्लोळ माजला. त्यातच कंपनीतील रसायनांच्या साठ्याचा स्फोट झाल्यास दोन कि.मी. परिसरात मोठी हानी होईल, असे मेसेज सोशल मीडियावर फिरु लागल्याने शाळा व्यवस्थापनाने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या पालकांना फोन करुन मुलांना घेऊन जाण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे एकीकडे मोठे मोठे स्फोट होत असताना भेदरलेल्या पोराबाळांना घेऊन पालक घरी
जात होते. - संबंधित वृत्त/५

ठाणे, भिवंडी, तळोजा, नवी मुंबई, अंबरनाथ येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबांनी चार ते पाच लाख लीटर पाण्याची फवारणी केल्यावरही रात्रभर आगीच्या ज्वाळा उठत होत्या. आगीच्या ज्वाळांमुळे केमिकलचे पेटलेले ड्रम उडून शेजारील फॅक्टरीत जाऊन पडल्याने तेथेही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता सुमारे दोन टन फोम मागविण्यात आला होता. सायंकाळी सात वाजल्यानंतर फणा काढलेल्या आगीला नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. रात्रीच्या अंधारात धुराचे काळे ढग आणि आकाशाचा रंग एकच झाला...

केमिकलच्या दुर्गंधीने झाला त्रास
केमिकलला लागलेल्या आगीमुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. त्यामुळे रहिवाशांसह अन्य कंपनीतील कामगारांना डोळे चुरचुरणे, घसा खवणखवणे, डोळ््यांतून पाणी येणे असा त्रास होऊ लागला. दुर्गंधीमुळे काहींनी मळमळू लागले. अनेकांनी त्यानंतर घटनास्थळापासून दूर धाव घेतली.

सेल्फी पॉइंट : आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करीत होते. तर, दुसरीकडे आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी लोटली होती. सोशल मीडियावर आगीच्या ज्वाळांसोबत आपले फोटो पोस्ट करण्यासाठी अनेकांनी जळत्या कंपनीच्या समोर उभे राहून सेल्फी काढले. पोलीस त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ही निर्ढावलेली माणसे त्या प्रयत्नांना दाद न देता सेल्फी काढत होती.

कंपनीचे मालक शीव येथील राजीव सेठ
मंगळवारी आगीत भस्मसात झालेल्या कंपनीचे मालक राजीव सेठ हे असून ते शीव येथे राहतात.

कामगारांच्या कुटुंबीयांच्या जीवाची वाढली धाकधूक
कंपनीत काम करणाºया कामगारांच्या कुटुंबीयांना आगीची माहिती मिळताच त्यांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. आपल्या नातेवाईकांचे मोबाइलमधील फोटो दाखवून ही व्यक्ती तुम्ही पाहिली का, अशी विचारणा काही कामगारांचे कुटुंबीय करीत होते. घटनेत एकही व्यक्ती दगावला नसल्याचे कळताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

परिसर केला मोकळा
आगीची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी या कंपनीशेजारील सर्व कंपन्यांमधील कामगारांना कंपनीबाहेर काढून परिसर मोकळा केला. तरीसुद्धा काही जण तेथे वरचेवर येत असल्याने पोलिसांनी जादा कुमक मागवली. चारही बाजूने अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या करत त्यातून पाण्याचा मारा सुरु केला. अग्निशमन दलाच्या गाड्यांना ये-जा करता यावी म्हणून परिसरात अन्य वाहने उभी करण्यास मनाई केली. स्टार कॉलनी ते शनीमंदिर हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला होता. कंपनीकडे जाणाºया प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कल्याण-शीळ रस्ता केला बंद
खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक शाखेने कल्याण शीळ रस्त्यावरील मोठ्या वाहनांना तासभरासाठी अन्य ठिकाणी वळवले होते. त्याचबरोबर, वाहतूक पोलिसांमार्फत उद्घोषणेद्वारे परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देण्यात येत होत्या.

Web Title: Black smoke, flames and fury fire in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.