कामगारांची पिळवणूक करणाऱ्या शौचालय ठेकेदारास काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करा, भाजपाची मागणी
By धीरज परब | Published: January 5, 2023 06:44 PM2023-01-05T18:44:03+5:302023-01-05T18:44:20+5:30
सदर कंत्राटदाराला मजूर - सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ३० हजार तर पर्यवेक्षकासाठी ३५ हजार रुपये पालिका देते. परंतु कंत्राटदार मात्र केवळ ३ हजार ते ९ हजार एवढेच वेतन कर्मचाऱ्यांना देतो. सदर बाब सुद्धा उघडकीस आली आहे.
मीरारोड - महापालिकेकडून कामगारांच्या नावे पूर्ण पैसे घेऊन कामगारांना मात्र नाममात्र वेतन देत त्यांची पिळवणूक करणाऱ्या शौचालय ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड रवी व्यास यांनी केली आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांची देखरेख व स्वच्छता करण्याचे काम मे 'शाईन मेंटेनन्स अँड सर्विस' या ठेकेदार संस्थेला दिले होते. ठेक्याचा करार महापालिकेने २०२० सालात केला होता. मात्र ठेकेदाराने शौचालयांची देखभाल दुरुस्ती व स्वच्छता करण्यात चालवलेला अक्षम्य हलगर्जीपणा तसेच सफाई कामगारांना किमान वेतन न देता नाममात्र वेतन देणे आदी प्रकारच्या तक्रारी मुळे पालिकेने त्याचा करार रद्द केला. मात्र पुढील व्यवस्था होईपर्यंत म्हणत पालिकेने काम मात्र त्याच वादग्रस्त ठेकेदाराच्या मार्फत सुरू ठेवले.
सदर कंत्राटदाराला मजूर - सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ३० हजार तर पर्यवेक्षकासाठी ३५ हजार रुपये पालिका देते. परंतु कंत्राटदार मात्र केवळ ३ हजार ते ९ हजार एवढेच वेतन कर्मचाऱ्यांना देतो. सदर बाब सुद्धा उघडकीस आली आहे.
त्यामुळे कामगाराचा छळ करणाऱ्या या कंत्राटदारांवर पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याची मागणी मीरा भाईंदर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड रवी व्यास यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र देऊन केली आहे.
या गैरव्यवहारात समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांची व ठेकेदाराची आर्थिक गुन्हे शाखा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा भाजपा आंदोलन करेल असा इशारा व्यास यांनी दिला आहे.