डांबराचा काळा धंदा जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:35 AM2018-04-07T04:35:49+5:302018-04-07T04:35:49+5:30

रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची चोरी आणि त्यामध्ये मार्बलच्या चुºयाची भेसळ करणारी टोळी सक्रिय असून, ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका ट्रकचालकास अटक केली. कळवा येथे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

 Blacksmith's business is loud! | डांबराचा काळा धंदा जोरात!

डांबराचा काळा धंदा जोरात!

Next

ठाणे -  रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची चोरी आणि त्यामध्ये मार्बलच्या चुºयाची भेसळ करणारी टोळी सक्रिय असून, ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका ट्रकचालकास अटक केली. कळवा येथे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
कंत्राटदारांना डांबराचा पुरवठा करण्याचे काम हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (एचपीसीएल)मार्फत केले जाते. एचपीसीएल कंपनी डांबर स्वत: विकत असली, तरी त्याच्या वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्ट कंपन्यांची मदत घेतली जाते. एचपीसीएलकडून टँकरमध्ये डांबर घेणे आणि ज्या कंत्राटदाराने मागणी केली, त्याला ते पोहोचविण्याचे काम ट्रान्सपोर्ट कंपन्या करतात. या वाहनांवरील चालक आणि क्लीनरच्या मदतीने डांबराची चोरी करून, त्यामध्ये मार्बलचा चुरा भेसळ करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी कळवा येथील पारसिक नाक्याजवळून एका ट्रक चालकास गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीचे नाव मुकीम अब्दुल रहमान (३२) असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्याचा, तर हल्ली चेंबूर येथे राहणारा आहे. ठाणे न्यायालयाने शुक्रवारी त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
डांबराचा भाव साधारणत: २0 हजार रुपये प्रतिटन आहे. एचपीसीएल कंपनीतून निघालेल्या डांबराच्या एका टँकरमधून साधारणत: दोन ते तीन टन डांबर आरोपी काढतात. ही भरपाई करण्यासाठी तेवढ्याच वजनाचा मार्बलचा चुरा कंटेनरमध्ये भरला जातो. हे काम कळंबोली भागात केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई हा या प्रकरणाचा केवळ पहिला टप्पा आहे. तपासातून या गोरखधंद्यात गुंतलेली मोठी टोळी उघडकीस येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. कळवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
‘एचपीसीएल’चे पथक सहभागी
पोलिसांनी या कारवाईची माहिती एचपीसीएलला दिली आहे. या कंपनीकडून दररोज किती आणि कुणाकुणाला डांबराचा पुरवठा केला जातो, त्यासाठी कोणकोणत्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांची मदत घेतली जाते, कंपनीमध्ये या कामाची जबाबदारी कुणाकुणावर आहे आदी मुद्द्यांच्या तपासासाठी पोलिसांना कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांनी एचपीसीएलचे कार्यकारी संचालक लक्ष्मण वेणुगोपाल यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार, कंपनीचे एक पथक ठाणे पोलिसांच्या मदतीसाठी लवकरच येणार आहे.

२0 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आरोपी मुकीम अब्दुल रहमान हा एचपीसीएलच्या मुंबई येथील डेपोमधून डांबर भरलेला टँकर घेऊन भिवंडी येथील वडपे येथे जात होता. वाटेत त्याने या टँकरमधील जवळपास २ टन डांबर क्लीनर आणि अन्य पाच-सहा आरोपींच्या मदतीने काढले. त्यानंतर, त्यामध्ये मार्बलची भेसळ करून टँकर वडपे येथे नेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. टँकरचा क्लीनर मात्र फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीजवळून १५ लाखांचा टँकर आणि जवळपास ५ लाखांचे डांबर पोलिसांनी हस्तगत केले.

कळंबोलीत लवकरच कारवाई
डांबराचा काळा धंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. डांबरात काळ्या मार्बलचा चुरा मिसळण्याचे काम कळंबोली भागात केले जाते. त्यासाठी डांबरचोरांनी तेथे मोठे युनिट उभारल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. हे युनिट जप्त करण्याची कारवाई पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Blacksmith's business is loud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.