दप्तरी दिरंगाईचा ठपका; उल्हासनगर महापालिका लिपिक निलंबित
By सदानंद नाईक | Published: July 1, 2024 05:02 PM2024-07-01T17:02:26+5:302024-07-01T17:03:29+5:30
दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवून वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांच्यावर आयुक्त अजीज शेख यांनी निलंबनाची कारवाई केली.
सदानंद नाईक, उल्हासनगर : दप्तर दिरंगाईचा ठपका ठेवून वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांच्यावर आयुक्त अजीज शेख यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईने लेटलतीफ व काम चुकार कामगारांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर महापालिका सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांनी तातडीच्या कामाबाबत टाळाटाळ, कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा व हयगय करीत असल्याचा ठपका आयुक्त अजीज शेख यांनी ठेवून सोमवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच वरिष्ठांकडून वेळोवेळी सूचना व समज देऊनही त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नसल्याचे आयुक्तांनी म्हटले. वरिष्ठ लिपिक इंगळे यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ७२ (क) मधील (१) व (२) चा भंग केला असल्याने कलम ७२ (क) मधील ३ अन्वये शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. सामान्य प्रशासन विभाग यांना नियमाप्रमाणे इंगळे यांना निर्वाह भत्ता मिळणार असून परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे निलंबित आदेशात म्हटले आहे.
वरिष्ठ लिपिक पूर्वा इंगळे यांच्यावर दफ्तरी दिरंगाईचा ठपका ठेवून निलंबन केले. या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसे आदेश आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढले आहे. तर दुसरीकडे चौकशी सुरू असताना एका महिला कर्मचाऱ्याला मालमत्ता कर विभागात वर्ग-१ च्या प्रभारी पदाचा पदभार दिला. ही महिला कर्मचारी दोन ते तीन महत्वाच्या पदाला।न्याय देईल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.