डोंबिवली पुन्हा एकदा हादरली, आर्च फार्मा कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:34 PM2018-09-17T13:34:32+5:302018-09-17T13:41:52+5:30
डोंबिवली शहराच्या पूर्व भागात सागाव येथील आर्च फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये आज पहाटे दोन वाजता स्फोट झाला.
डोंबिवली - शहराच्या पूर्व भागात सागाव येथील आर्च फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये आज पहाटे दोन वाजता स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनी परिसरातील इमारतींना जबरदस्त हादरा बसला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेमुळ प्रोबेस कंपनीच्या स्फोटाची आठवण नागरिकांना झाली. पुन्हा एकदा डोंबिवली हादरली आहे. दोन वर्षात पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षिततेची काळजी कंपन्या घेत नसल्याची बाब या निमित्ताने प्रकर्षाने सामोर आली आहे.
औषधे उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आर्च फार्मा कंपनीत तयार केला जातो. कच्च्या मालावर प्रक्रिया सुरु असताना रिअॅक्टरमध्ये पहाटे दोन वाजता स्फोट झाला. रिअॅक्टर क्लिनींग करण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी हवेचा दाब रिअॅक्टरमध्ये वाढला. त्यामुळे हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला त्याचा मोठा हादरा बसला. शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना वाटले की, त्यांच्या शेजारची इमारत पडली. तर काहींना भूकंप झाला असल्याचे वाटले. पहाटे दोन वाजता भयभीत झालेले नागरीक घराबाहेर आले तेव्हा शेजारच्या कंपनीत स्फोट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीच्या इमारतीचा सज्जा स्फोटामुळे कोसळून पडला आहे.
कंपनीतील सुरक्षा अधिकारी राजेश भगत यांनी कंपनीत स्फोट झाला असल्याचे मान्य केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. रिअॅक्टरचं क्लिनिंग सुरू असताना हवेचा दाब वाढल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनी परिसरातील इमारतीत राहणारे गजानन जाधव यांनी सांगितले की, स्फोटामुळे आसपासच्या परिसराला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे नागरी वस्तीतील लोक भयभीत झालेले आहेत.
जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. दोन वर्षानंतर पुन्हा आर्च फार्मा कंपनीत स्फोट झाला. सरकारने या घटनातून काही बोध घेतलेला नाही. प्रोबेसच्या चौकशी अहवालात धोकादायक कंपन्या विषयी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याही सरकारने स्विकारलेल्या नाहीत. सरकार नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहे.