इंडो अमाइन कंपनीत स्फोटासारखा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:48 AM2017-08-03T01:48:34+5:302017-08-03T01:48:34+5:30
सागाव येथील इंडो अमाइन्स कंपनीच्या आवारातील २०० लीटर क्षमतेच्या आॅक्सिक्लोराइड केमिकलच्या रिकाम्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास स्फोटासारखा जोरदार आवाज झाला.
डोंबिवली : सागाव येथील इंडो अमाइन्स कंपनीच्या आवारातील २०० लीटर क्षमतेच्या आॅक्सिक्लोराइड केमिकलच्या रिकाम्या ड्रमचा पाण्याशी संयोग झाल्याने बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास स्फोटासारखा जोरदार आवाज झाला. मात्र, या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचा दावा कंपनीने केला. प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीत अफवांना अक्षरश: ऊत आला.
डोंबिवली औद्योगिक फेज-२ मधील कंपनीत ही घटना घडली, तेव्हा दिवस आणि जनरल पाळीचे मिळून १५ कामगार कामावर हजर होते. दोन कामगारांनी फॉस्फरस आॅक्सिक्लोराइडचा ड्रम उघडण्याचा प्रयत्न केला असता उच्च दाबामुळे त्याचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या स्फोटामुळे कंपनीतील कामगार भीतीने बाहेर पळाले. कंपनी प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सुधाकर पाटील यांनी सांगितले की, ड्रममध्ये हवा पकडल्याने त्याचे झाकण उडाले आणि त्यामुळे आवाज झाला. मात्र, कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, या घटनेमुळे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले होते.
दरम्यान, फॉस्फरस आॅक्सिक्लोराइड या केमिकलचा ड्रम उडून भिंतीवर आपटल्याच्या वृत्ताला इंडस्ट्रियल सेफ्टी अधिकाºयांनी दुजोरा दिला. या प्रकरणाची मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलातील उच्चपदस्थ अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्या अपघाताच्या ठिकाणी अधिकारी-कर्मचाºयांनी पाहणी केली असता २०० लीटरचा केमिकलचा रिकामा ड्रम होता. त्यात पावसाचे पाणी गेल्याने त्यामधील प्रेशर वाढल्याने स्फोट झाला.
यासंदर्भात इंडस्ट्रियल सेफ्टी विभागाच्या घटनास्थळाला भेट दिलेल्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केमिकल कंपनीत पीओसीएल (फॉस्फरस आॅक्सिक्लोराइड) असलेला ड्रम उघडत असताना उच्च दाबामुळे ड्रम आणि त्याचे झाकण उडाले आणि ते कंपनीतच एका बीमवर आदळल्याने आवाज झाला. घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात इंडस्ट्रियल सेफ्टी विभागाच्या सहसंचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही चौकशीसाठी अधिकाºयांना पाठवले असून त्यांचा अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती देता येईल.