बेकायदा बांधकामाला आशीर्वाद?, केडीएमसी आयुक्तांना दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:31 AM2018-05-13T06:31:25+5:302018-05-13T06:31:25+5:30
पश्चिमेतील जयहिंद कॉलनीतील प्रभाग क्रमांक ५७ मधील बेकायदा बांधकामांबाबत काँग्रेसच्या नगरसेविका तसेच महिला बालकल्याण समिती
डोंबिवली : पश्चिमेतील जयहिंद कॉलनीतील प्रभाग क्रमांक ५७ मधील बेकायदा बांधकामांबाबत काँग्रेसच्या नगरसेविका तसेच महिला बालकल्याण समिती, शिक्षण मंडळ समिती सदस्या हर्षदा भोईर यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, महापालिकेने त्यावर कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या दिरंगाई आणि मनमानी कारभाराबद्दल माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भोईर म्हणाले की, जयहिंद कॉलनी प्रभागात कॅप्टनवाडी येथे होत असलेल्या बेकायदा बांधकामांबद्दल २० एप्रिलला आयुक्तांना पत्र दिले. पण, कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच पत्रालाही उत्तर मिळाले नाही. बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी राज्य सरकारने ३ मे रोजी अध्यादेश काढला आहे, पण त्याची अंमलबजावणी जर होणार नसेल, तर उपयोग काय? नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे बेकायदा बांधकाम सुरू असल्याबद्दल दाद कोणाकडे मागायची, असा सवाल त्यांनी केला.
प्रभागातील नागरिकांची पत्रेही आयुक्तांना दिलेल्या पत्रासोबत जोडली आहेत. पण, तरीही काही उपयोग झाला नाही. त्यासंदर्भात १७ एप्रिलला ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनाही पत्र दिले, पण त्यांनीही कानाडोळा केल्याचे भोईर म्हणाले. बेकायदा बांधकामांवर कारवाईत होत नसल्याने काम करणे कठीण होत असल्याचे हर्षदा भोईर म्हणाल्या. प्रभागक्षेत्र अधिकारी लक्ष देत नाहीत, त्यात आता आयुक्तही कानाडोळा करत असतील तर मात्र परिस्थिती गंभीर आहे, असे हृदयनाथ भोईर म्हणाले.