‘ब्लेसिंग’ धक्क्याजवळ पोहोचली, उत्तन धक्क्याजवळ बोट उधाणामुळे उलटली; खलाशी सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:40 AM2017-09-22T05:40:53+5:302017-09-22T05:40:56+5:30
मुसळधार पावसासह १९ सप्टेंबरला समुद्राला आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रेतीसदृश छोट्या बेटावर चढून उलटली.
भार्इंदर : मुसळधार पावसासह १९ सप्टेंबरला समुद्राला आलेल्या उधाणामुळे उत्तनच्या चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात असलेली ब्लेसिंग ही मासेमारी बोट रेतीसदृश छोट्या बेटावर चढून उलटली. गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास तिला धक्क्याजवळ आणले.
मुसळधार पावसामुळे ही बोट उत्तन किनाºयावरील नवी खाडी येथून चौक धक्क्याजवळ नांगरण्यासाठी जात होती. परंतु, जोरदार वादळी वाºयामुळे बोटीचा तांडेल नीलेश डिमेकर याला समुद्रातील रेतीसदृश छोटे बेट न दिसल्याने त्या बेटावर बोट चढून ती उलटली.
समुद्राला उधाण आल्याने तिला किनाºयावर घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यातील खलाशांनी उत्तन किनाºयावरील मच्छीमारांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच बोटीतील प्लास्टिकच्या कॅनद्वारे समुद्रात उड्या घेतल्या. प्रवाहामुळे ते वसईच्या समुद्रकिनारी जाऊ लागले. बॉबीलोन बोटीतील खलाशांनी त्यांना बोटीत घेतले. दुसºया दिवशी सकाळी मिशन ब्लेसिंग सुरू झाले. पण बोट पूर्णपणे उलटी होऊन बुडू लागली. मच्छीमारांनी बोटींना दोरखंडाने बांधून ठेवले.यात बोटीचे नुकसान झाले.
>चारही बेपत्ता बोटी मुंबईत पोहोचल्या
अलिबाग : मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेलेल्या आणि मंगळवारी खलाशांसह बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटी मुंबईत ससून डॉकमध्ये गुरुवारी पहाटे सुखरूप पोहोचल्या. याबाबतची माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’ला दिली. या चार बोटींमध्ये अलिबाग तालुक्यातील रेवस मच्छीमार सोसायटीचे सदस्य किशोर श्याम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’, कमलाकर कोळी यांची ‘गंगासागर’ आणि करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व कृष्णा महादेव कोळी यांची ‘हेरंभशिवलिंग’ यांचा समावेश आहे.