आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:17 AM2019-05-29T06:17:31+5:302019-05-29T06:17:41+5:30
कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले.
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : चिकाटी आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते. कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले. विशेष म्हणजे दोनच वर्षांपूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. प्रथमेश हा बिर्ला कॉलेजच्या कला शाखेचा विद्यार्थी असून त्याच्या यशामुळे त्याच्या आईवडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.
प्रथमेश हा जन्मत:च अंध आहे. त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरकडे तपासणी केली, तेव्हा तो अंध असल्याचे त्यांना समजले. प्रथमेशचे वडील धीरेंद्र हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. आई प्रतीक्षा ही गृहिणी आहे. त्याला एक बहीण आहे. तीही जन्मत:च अंध आहे. ती सहावीत शिकत आहे. परीक्षेच्या काळात त्याला तीन दिवस खूप त्रासही झाला होता. त्याला परीक्षेच्या काळात रिअॅक्शन होऊन अतिसाराचा त्रास झाला होता. या परिस्थितीतही त्याने जिद्द न सोडता परीक्षा दिली. त्याला मराठीत ७३, इंग्रजीत ७६, भूगोल ४७, इतिहास ५५, राज्यशास्त्र ४३, ग्रेड विषयात ५० पैकी ४२ गुण मिळाले आहेत. प्रथमेशला इतिहास विषय घेऊन पदवी संपादन करायची आहे. वीर सावरकर संस्थेची २६ मे ला शिवाजी पार्कला मॅरेथॉन स्पर्धा झाली होती. त्यात त्याला विशेष पारितोषिक मिळाले आहे. प्रथमेश सुरुवातीला पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत जात होता. तो अंध असल्याचे समजताच त्याच्या आईने ‘नॅब’चा एक कोर्स पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे संगोपन कसे करायचे हे तिला समजले. नॅबकडून एक शिक्षक येऊन त्याला शिकवत होते. त्याला ब्रेल लिपीतून अभ्यास करावा लागणार असला तरी तो डोळस मुलांच्या शाळेत शिकावा, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी प्रथमेशला सरस्वती मंदिर शाळेत घातले. लहान असताना स्नेहसंमेलनात तो सहभागी होत असे. नॅब ही दहावीपर्यंतचे अभ्यासक्रमाचे रेकार्डिंग देत असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी स्नेहांकितसंस्थेशी संपर्क साधला. या संस्थेने त्याला रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले. अंधत्वावर मात करीत शिक्षण घेत असताना प्रथमेशला आणखीन एक समस्या उद्भवली. त्याची मूत्रपिंड कमी प्रमाणात काम करीत असल्याचे वैद्यकीय तपास अहवालात उघड झाले. इयत्ता सातवी ते नववीपर्यंत प्रथमेशच्या मूत्रपिंडावर उपचार सुरू होते. नववीचे पूर्ण वर्ष तो डायलिसिसवर होता. ७६ तासांचे डायलिसिस घेऊन त्याला शाळेत हजर राहता येत नव्हते.
>वडिलांनी दिले मूत्रपिंड
मूत्रपिंड निकामी झाल्याने प्रथमेशच्या आईवडिलांसमोर मोठा पेच निर्माण झाला. वडिलांना आपल्या मुलाच्या वेदना सहन होत नव्हत्या. त्यांनी त्याला आपली किडनी दिली. मूत्रपिंड प्रत्यारोपणाने प्रथमेशला एक प्रकारे जीवदान मिळाले. त्यानंतरही त्याचा त्रास सहन झाला नाही. त्यांना काही पथ्ये पाळावी लागतात. अन्न-पाणीसोबत ठेवावे लागते. त्याला रक्तदाब व मधुमेहाचाही त्रास आहे. एवढे सर्व सहन करून त्याने दहावीत ७५ टक्के गुण मिळविले होते.