नेत्रदानाबाबत अद्यापही अंधश्रद्धा, डॉ. तात्याराव लहानेंना खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 03:20 AM2019-01-07T03:20:55+5:302019-01-07T03:21:25+5:30
डॉ. तात्याराव लहाने : सिंधुताई सपकाळ यांना जीवनगौरव पुरस्कार
ठाणे : नेत्रदानात आपण खूप मागे आहोत. महाराष्ट्रात २५ हजार, तर भारतात २२ लाख जणांना डोळ्यांची गरज आहे. श्रीलंकेत एक लाख लोक मृत्यू पावले, तर दोन लाख डोळे मिळतात. आपल्याकडे नेत्रदानाबाबत अंधश्रद्धा आहे. नेत्रदान, अवयवदान करा आणि हे करून तुम्ही सर्वांचे आई व्हा, असे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी ठाण्यात केले.
जागर फाउंडेशन आयोजित जागर गौरव सोहळा रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी डॉ. लहाने म्हणाले की, माणसाला मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय मोठे होता येत नाही. सामान्यातून मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, असेही ते म्हणाले. जंकफूड आपल्या शरीरासाठी घातक आहे. आपल्या जिभेला लगाम घाला आणि जंकफूड टाळा. भाकरी, भाजी खा आणि भरपूर आयुष्य जगा, असा संकल्प या नवीन वर्षात करा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोड पदार्थ टाळा. रोज व्यायाम करा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खा. औषधे टाकल्याने डोळे खराब होतात. सकाळ-संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आपल्या पाल्यांचे डोळे आपण खराब करत आहोत. सहा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा रडू लागला की, त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात पालक मोबाइल देतात. तो रडतो म्हणून मोबाइल देणे म्हणजे त्याच्या डोळ्यांचे नुकसान करणे. दिवसभर मोबाइल पाहिल्याने एक डोळा अधू होतो. घरात आल्यावर मोबाइल बंद करा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी आ. संजय केळकर यांना आदर्श आमदार, तर सिंधुताई सपकाळ यांना जागर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट पत्रकार, नगरसेवक पुरस्कार
लोकमत, ठाणेचे उपमुख्य उपसंपादक अजित मांडके यांना यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरवण्यात आले. याचबरोबर पत्रकार निलेश पानमंद, प्रज्ञा सोपारकर यांनाही सन्मानित करण्यात आले. शैलेश पुराणिक आणि गडकरी कट्ट्याचे संचालक संजय पाटील यांना उद्योग गौरव पुरस्कार, डॉ. समीरा भारती, अर्चना पाटील, अॅड. चेतन पाटील यांना समाज गौरव पुरस्कार, डी.आर. जाधव यांना क्रीडा गौरव, कौस्तुभ तारसाळे यांना मरणोत्तर शौर्य, सुनील सिनलकर यांना ज्ञान गौरव, अशोक जिज्ञासी विशेष सेवा गौरव, भारतीय मराठा संघाला सेवाभावी संस्था, आदेश भगत, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांना जनआंदोलक, डॉ. महेश बेडेकर यांना दक्ष नागरिक, मुंब्रा प्रभाग समितीला विशेष पुरस्कार, दिवा प्रभाग क्र. २७ ला अस्वच्छ प्रभाग पुरस्कार, सिद्धार्थ ओवळेकर, सुनीता मुंढे, सुनेश जोशी, नंदा पाटील, रागिणी बैरीशेट्टी, मालती पाटील यांना उत्कृष्ट नगरसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले.