होळीच्या वर्गणीसाठी केलेली नाकाबंदी बेतली जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:09+5:302021-04-01T04:42:09+5:30
कसारा : सर्वत्र धुळवडीचा उत्साह सुरू असतानाच शहापुरातील काही मित्र निवांत, जंगल सफरीसाठी निघाले होते. त्यातील शहापूर चेरपोली ...
कसारा : सर्वत्र धुळवडीचा उत्साह सुरू असतानाच शहापुरातील काही मित्र निवांत, जंगल सफरीसाठी निघाले होते. त्यातील शहापूर चेरपोली येथील दोन जिवाभावाचे मित्र फिरण्यासाठी तांबडमाळकडे दुचाकीवरून जात होते; परंतु दोन अल्पवयीन मुलांनी होळीच्या वर्गणीसाठी केलेली नाकाबंदी एकाच्या जिवावर बेतली.
खेळण्यातील या नाकाबंदीमुळे फिरायला निघायला गेलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाला दोरीचा फास बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहापूर तालुक्यात घडली.
चिंतामण भोईर, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिंतामण व संतोष पाटील हे दोन मित्र तांबडमाळकडे फिरण्यासाठी जात असताना रस्त्यावरील एका पाड्यातील छोटी मुले होळी खेळत होती. रस्त्यावर एक दोरी बांधून जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्याकडून होळीची वर्गणी घेत होती. याचदरम्यान हे दोघे भरधाव वेगात दुचाकीवरून जात असताना चिंतामण याला समोरची नायलाॅनची दोरी दिसलीच नाही. ती दोरी गळ्याभोवती अडकल्याने भोईर व पाटील यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते रस्त्यावर पडले. दरम्यान, चिंतामण याच्या गळ्याभोवती मोठी जखम होत ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
निष्पाप मुलांचे भवितव्य अंधारात
दरम्यान, फिर्यादीनुसार शहापूर पोलिसांनी अल्पवयीन दोन मुलांवर गुन्हा दखल केला आहे. खेळण्याच्या नादात असणाऱ्या गोरगरिबांच्या या निष्पाप मुलांचे भवितव्य अंधारात गेले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या निष्पाप चालकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात नियतीने खेळ रचल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.