लोकमत आणि ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 08:28 PM2021-07-15T20:28:03+5:302021-07-15T21:21:03+5:30
लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (१६ जुलै रोजी) नाते रक्ताचे या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त हे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (१६ जुलै रोजी) नाते रक्ताचे या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त हे आयोजन केले असून पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सुप्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात हा उपक्रम होणार आहे.
कोरानामुळे राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. रक्तामुळे रुग्णांने जीवदान मिळावे तसेच रक्ताचा तुटवडा भरुन निघण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा, पोलीस उपायुक्त यांच्या तीन हात नाका येथील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर रिक्षा चालक तसेच सामान्य नागरिकही रक्तदान करणार आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करण्याचे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.