रक्तदान शिबिरे जिल्हा रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांसाठी ठरताहेत संजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:53 AM2020-01-11T00:53:17+5:302020-01-11T00:53:26+5:30
श्रेष्ठदानांपैकी एक दान समजल्या जाणाऱ्या रक्तदानासाठी रक्तदात्यांची संख्या ठाण्यात वाढत आहे.
पंकज रोडेकर
ठाणे : श्रेष्ठदानांपैकी एक दान समजल्या जाणाऱ्या रक्तदानासाठी रक्तदात्यांची संख्या ठाण्यात वाढत आहे. मागील तीन वर्षांत रक्तदान शिबिरांची संख्या वाढल्याने ब्लडबॅगांची संख्याही वाढू लागली आहे. या वाढत्या ब्लडबॅगांमुळे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताची कमतरता भासत नाही. शिबिरांतून संकलित होणाºया रक्ताचा पुरेपूर वापर होत असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. २०१९ मध्ये पाच हजार १३ ब्लडबॅगा रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसह अपघातांत गंभीररीत्या जखमी होणाºया रुग्णांसाठी हे रक्त सर्वाधिक उपयुक्त ठरत असल्याचे ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात २०१९ मध्ये आयोजित केलेल्या ७२ शिबिरांमध्ये चार हजार ३५९ ब्लडबॅगा जमा झाल्या. या बॅगांचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सर्वतोपरी लक्ष दिले गेले. साधारणत: एका बॅगेच्या तीन बॅगा तयार होतात. हे रक्त रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांनाच उपयुक्त ठरत आहे. प्रसूतीदरम्यानच्या रुग्ण महिला आणि अपघातांत गंभीररीत्या जखमी होणाºया रुग्णांसाठी या रक्ताचा मुख्यत्वे वापर केला जातो. रुग्णाला शासनाने निश्चित करून दिलेल्या दरानुसार रक्त उपलब्ध करून दिले जाते. रुग्णालयाबाहेरील २० टक्के रुग्णांना यानुसार रक्त उपलब्ध करून दिले आहे. रक्तदाता किंवा त्यांचे नातेवाईक अथवा मित्र मंडळींना गरज पडल्यास वर्षातून एक रक्तबॅग मोफत देण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
२०१७ मध्ये झालेल्या ६६ ब्लडकॅम्पमध्ये चार हजार ३५ ब्लडबॅगा जमा झाल्या होत्या. चार हजार ३०७ रुग्णांसाठी हे रक्त गरजेनुसार वापरण्यात आले.
>२०१८ मध्ये ठाणे जिल्ह्यात ६९ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यातून रक्ताच्या चार हजार १४८ बॅग जमा झाल्या होत्या. त्या रक्ताचा वापर चार हजार ६७० रुग्णांसाठी झाला. २०१९ मध्ये रक्तदान शिबिरांचे प्रमाण काहिसे वाढले. त्यामुळे साहजिकच ब्लडबॅगा जमा होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे २0१९ मध्ये पाच हजार १३ रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होऊ शकल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.